लोकसभेमध्ये केवळ १५ खासदारांचीच उपस्थिती १०० टक्के

३५ खासदारांनी एकही प्रश्‍न विचारला नाही !

आता संसदेत उपस्थित रहाण्यावरूनच या लोकप्रतिनिधींना वेतन आणि अन्य भत्ते दिले पाहिजेत. विनाकारण अनुपस्थित रहणार्‍यांकडून दंडही वसूल केला पाहिजे !

संसद भवन

नवी देहली – संसदेच्या कामकाजावर लक्ष ठेवणार्‍या ‘पीआर्एस् इंडिया’ या संस्थेने लोकसभेत केवळ १५ खासदारांची १०० टक्के उपस्थिती असते, तर ३५ खासदारांनी प्रश्‍नही विचारलेला नाही, असे सर्वेक्षणाअंती म्हटले आहे. यांतील ५ जणांनी कधीही चर्चेत भाग घेतला नाही किंवा खासगी विधेयकही मांडले नाही. याउलट ९ खासदारांनी २५० पेक्षा अधि प्रश्‍न विचारले, अशी माहती समोर आली आहे. त्यातही १ जून २०१९ ते १३ फेब्रुवारी २०२१ या काळात ज्या खासदारांनी एकही प्रश्‍न विचारला नाही त्यात काँग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी, समजवादी पक्षाचे अखिलेश यादव, मुलायमसिंह यादव, भाजपचे एस्.एस्. अहलुवालिया, माजी मंत्री राधामोहन सिंह यांच्यासारख्यांचा समावेश आहे. ज्यांनी प्रश्‍न विचारला नाही त्यात भाजपचे १७ सदस्य आहेत.

१. १०० टक्के उपस्थित रहाणार्‍या १५ खासदारांमध्ये ११ भाजप, तर द्रमुक आणि जनता दल (संयुक्त) यांचे प्रत्येकी २ सदस्य आहेत. सर्वांत अल्प (२ टक्के) उपस्थिती बसपचे अतुलकुमार सिंह यांची आहे. डायमंड हार्बरचे अभिषेक बॅनर्जी यांची उपस्थिती केवळ १२ टक्के होती आणि त्यांनी केवळ एक प्रश्‍न विचारला. हमीरपूरचे भाजपचे पुष्पेंद्रसिंह चंदेल यांनी सर्वाधिक ५१० वेळा चर्चेत भाग घेतला.

२. राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी सर्वाधिक २८६ प्रश्‍न विचारले आणि ४ खासगी विधेयके सादर केली. धुळ्याचे भाजपचे सुभाष भामरे आणि शिरूरचे राष्ट्रवादी काँग्रेसचे अमोल कोल्हे यांनी प्रत्येकी २७७ प्रश्‍न विचारले. मावळचे श्रीरंग बारणे यांनी २५९, तर मुंबई उत्तर- पश्‍चिमचे गजानन कीर्तीकर यांनी २५५ प्रश्‍न विचारले.