Pakistan MP Maulana Fazlur Rehman : पाकिस्तानमध्ये वर्ष १९७१ ची स्थिती पुन्हा येण्याची शक्यता !

  • खासदार मौलाना फजलूर रेहमान यांनी व्यक्त केली चिंता

  • बलुचिस्तान पाकपासून स्वतंत्र होण्याची व्यक्त केली शक्यता !

(मौलाना म्हणजे इस्लामचा अभ्यासक)

खासदार मौलाना फजलूर रेहमान

इस्लामाबाद (पाकिस्तान) – बलुचिस्तान कधीही पाकपासून स्वतंत्र झाल्याची घोषणा करू शकतो. बलुचिस्तान प्रांतातले ५ ते ७ जिल्हे मिळून स्वतंत्र झाल्याची घोषणा करू शकतात. वर्ष १९७१ मध्ये बांगलादेश पाकिस्तानपासून वेगळा होऊन स्वतंत्र झाला. जर सध्याच्या शासनकर्त्यांची मानसिकता पालटली नाही, तर पुन्हा तीच परिस्थिती आताही उद्भवू शकते, असे विधान पाकचे खासदार मौलाना फजलूर रेहमान यांनी पाकच्या संसदेत केले. या विधानामुळे पाकिस्तानच्याच नव्हे, तर आशियातील राजकीय वर्तुळात चर्चा चालू झाली आहे.

रेहमान पुढे म्हणाले की, जर बलुचिस्तानमधल्या या जिल्ह्यांनी स्वतंत्र झाल्याची घोषणा केली, तर संयुक्त राष्ट्रे त्वरित त्यांचा हा प्रस्ताव स्वीकारेल आणि पाकिस्तान या सर्व घडामोडींसमोर नमते घेईल.

बलुचिस्तानची स्थिती !

बलुचिस्तान हा पाकिस्तानमधील आकारमानाच्या दृष्टीने सर्वांत मोठा प्रांत असून लोकसंख्येच्या संदर्भात मात्र पिछाडीवर आहे. इथे पाकिस्तानच्या एकूण लोकसंख्येपैकी केवळ २ टक्के नागरिक रहातात. या भागातील कुर्रम परिसरात शिया आणि सुन्नी या २ समुदायांमध्ये हिंसाचाराच्या अनेक घटना घडल्या आहेत. नोव्हेंबर २०२४ पासून अर्थात् गेल्या ४ महिन्यांत या भागातील हिंसाचारात १५० हून अधिक नागरिकांचा बळी गेला आहे.