गदारोळामागील तथ्य शोधा !

मेळघाट व्याघ्र प्रकल्पातील हरिसाल परिक्षेत्रातील वनअधिकारी आर् एफ् आे दीपाली चव्हाण यांनी स्वतःवर गोळ्या झाडून आत्महत्या केली आहे. राजकीय वर्तुळातून यासंदर्भात प्रतिक्रिया व्यक्त करण्यात येत आहेत. आत्महत्या करण्यापूर्वी लिहिलेल्या चिठ्ठीतून त्यांनी त्यांचे अधिकारी उपवनसंरक्षक विनोद शिवकुमार यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. लैंगिक शोषण आणि असभ्य वर्तणूक हे त्यातील प्रमुख घटक आहेत.

महिलांवरील अत्याचार हा विषय गेल्या काही वर्षांत अत्यंत संवेदनशील झाला आहे. असे असतांना दीपाली चव्हाण यांनी केलेल्या तक्रारींकडे त्यांच्या वरिष्ठांनी दुर्लक्ष का केले ? एखाद्या महिलेचा गर्भपात होईपर्यंत तिच्याकडून काम करून घेणे, हे कोणत्या नियमावलीत बसते ? रात्री-अपरात्री बाहेर भेटायला बोलावणे, अश्‍लील शिवीगाळ करणे, हे सर्व विनोद शिवकुमार करत असतांना त्यांचे वरिष्ठ श्रीनिवास रेड्डी यांनी काय पावले उचलली ? आता जेव्हा दीपाली पवार यांनी आत्महत्येचे टोकाचे पाऊल उचलले, तेव्हा शिवकुमार यांना निलंबित केले आहे. त्यांच्या निलंबनाने दीपाली चव्हाण यांचा गेलेला जीव परत येणार आहे का ? शिवकुमार यांना पाठीशी घालणारे अपर प्रधान मुख्य वनसंरक्षक श्रीनिवास रेड्डी यांचे अन्यत्र स्थानांतर करण्यात आले आहे. स्थानांतर केल्याने काय साध्य होणार आहे ? ते जिथे जातील, तिथे अशा प्रकारे दोषींना पाठिंबा देणार नाहीत का ? महिला कर्मचार्‍यांना अजूनही कशा प्रकारच्या त्रासाला सामोरे जावे लागते, हे या घटनेने जगासमोर आले आहे.

दीपाली यांच्या कामात अडथळे

आर् एफ् आे दीपाली चव्हाण

शिवकुमार यांनी केवळ लैंगिक छळवणूकच केली नाही, तर दीपाली यांच्या कामातही जाणीवपूर्वक अडथळे आणले. दीपाली चव्हाण ज्या गावांत पुनर्वसनाचे कार्य करत होत्या, तेथील आरोपीला कह्यात घेण्यासाठी शिवकुमार यांनीच त्यांना संबंधित गावात पाठवले होते. तेथे गेल्यानंतर दीपाली चव्हाण यांच्या लक्षात आले की, जमाव प्रक्षुब्ध आहे. त्या जमावाने दीपाली यांना कोंडून ठेवले. त्यांच्यावर आदिवासींच्या तक्रारीवरून अ‍ॅट्रॉसिटीचा गुन्हा नोंद झाला. या सर्व प्रसंगात सरकारी कामासाठी वरिष्ठांच्या आदेशानेच कार्यरत असूनही दीपाली यांना शिवकुमार यांनी कोणतेही साहाय्य केले नाही. ‘४ मास कारावासात राहिल्यावर कसे वाटते ते पहा’, असे शिवकुमार त्यांना म्हटल्याचे दीपाली यांनी लिहिले आहे. हे सर्व पहाता ‘दीपाली यांना कामापासून परावृत्त करण्यासाठी शिवकुमार यांनीच त्यांना जाणीवपूर्वक अडकवले’, असे म्हणण्यास वाव रहातो.

वनअधिकारी आर्. एफ्. आे दीपाली चव्हाण यांचा त्यांच्या कार्यक्षेत्रात दरारा होता. ‘लेडी सिंघम’ अशी ओळख असलेल्या त्या धडाडीच्या अधिकारी होत्या. स्पर्धा परीक्षांचा कठीण टप्पा ज्यांनी पार पाडला आहे, त्यांना कार्यालयातील लैंगिक छळवणुकीचा सामना करण्यात अडचणी याव्यात, एवढे तेथे काय घडले आहे, हेही समोर यायला हवे. वयाच्या ३३ व्या वर्षी कार्यातील यश, प्रसिद्धी आदी सर्व असतांना अशा चौकटीबाहेरील क्षेत्रात धडाडीने काम करणारी महिला लैंगिक छळवणुकीमुळे आत्महत्या करण्याएवढे टोकाचे पाऊल उचलते, हे अस्वीकारार्ह आहे. त्यामुळेच या प्रकरणाचे काही वेगळे कंगोरे पडताळून पहाण्याची आवश्यकता आहे.

अन्य धागेदोरे पडताळा !

केंद्र आणि राज्य सरकारकडून वन विभाग, आदिवासी कल्याण विभाग आदी विभागांसाठी मोठी आर्थिक तरतूद केली जाते. प्रत्यक्षात कामाच्या नावाने उजेडच असलेला सर्वत्र पहायला मिळतो. वनविभागाचे अधिकारी आणि कर्मचारी चांगल्या कामांसाठी कमी अन् अशा वेगळ्या कारणांनीच अनेक वेळा प्रसिद्धीच्या झोतात असतात. वर्ष २०१४ मध्ये गोंदिया जिल्ह्यातील वन विभागातील अधिकारी आणि बरेच कर्मचारी यांचे नक्षलवाद्यांशी असलेले संबंध उघड झाले होते. त्या वेळी वनसंपत्तीचा लाभ नक्षलवाद्यांना मिळण्यासाठी वनविभागाचे काही कर्मचारी काम करत असल्याचे दिसून आले होते. काही अधिकारी नक्षलवाद्यांना आर्थिक रसदही पुरवत होते. जे सहकारी अशी कामे करण्यास नकार देत, त्यांना नक्षलवाद्यांचे भय दाखवले जात असे.

वास्तविक वनसंपत्तीचे जतन करणे, तस्कर, स्थानिक आदींकडून होणारी अवैध वृक्षतोड रोखणे, जंगलातील नैसर्गिक डिंक, बांबू यांचा योग्य विनियोग करणे, यांसाठी वनखात्याने काम करायचे असते. याच कारणाने वन विभाग हा सर्वाधिक भ्रष्टाचार होणार्‍या विभागांतील एक विभाग आहे. वन विभागातील बरेच कर्मचारी, अधिकारी हे लाकूड तस्करांशी संगनमत साधून स्वतःचा आर्थिक लाभ करून घेत असतात. एकीकडे जंगलातील संपत्तीवर अधिकार सांगणारे स्थानिक आदिवासी, दुसरीकडे तस्कर आणि वन अधिकारी असे संघर्ष वारंवार घडत असतात. अशा परिस्थितीत दीपाली यांना जाणीवपूर्वक प्रक्षुब्ध स्थानिकांना सामोरे जाण्यास लावणारे शिवकुमार नेमके कुणाशी संगनमत साधून होते ? शिवकुमार स्थानिकांसमोर दीपाली यांची बाजू न घेता त्यांना शिवीगाळ करायचे. दीपाली चव्हाण पुनर्वसन कार्यासाठी ज्या गावांत काम करत होत्या, त्या गावांत एकही सभा घेण्यास शिवकुमार आले नाहीत, असे त्यांनी उघडपणे म्हटले आहे. दीपाली चव्हाण यांच्यावर शिवकुमार यांचा एवढा का राग होता ? ‘शिवकुमार यांच्या मर्जीप्रमाणे न वागल्यामुळे ते माझे शोषण करत आहेत’, असे दीपाली चव्हाण यांनी म्हटले आहे. शिवकुमार यांचे असे मर्जीतले काम कोणते होते ? धडाडीने काम करणार्‍या दीपाली चव्हाण शिवकुमार यांच्या कोणत्या कार्यात अडचणीच्या ठरत होत्या, याचा शोध घेतल्यास या सर्व प्रकरणाला खरी दिशा सापडेल. वन विभागाचे नाव अशा प्रकारे नक्षलवादी, तस्कर आदींशी जोडलेले असल्यामुळेच दीपाली चव्हाण प्रकरणातील केवळ एकाच धाग्याचा विचार होऊ नये. कदाचित आता जो लैंगिक शोषणाचा गवगवा होत आहे, त्या गदारोळामागे काही तथ्ये झाकण्याचा प्रयत्न तर होत नाही ना, याचाही विचार होणे आवश्यक आहे. तीच वनअधिकारी दीपाली चव्हाण यांना श्रद्धांजली ठरेल !