राज्यपालांची भेट घेऊन भाजपच्या शिष्टमंडळाची मागणी
मुंबई – मनसुख हत्या प्रकरण आणि पोलिसांच्या स्थानांतरातील रॅकेट यांविषयी मुख्यमंत्री एक शब्दही बोलत नाहीत. मुख्यमंत्र्यांचे मौन अतिशय चिंताजनक आहेत. मुख्यमंत्री बोलत नसतील, तर घटनात्मक प्रमुख म्हणून राज्यपालांनी या प्रकरणांविषयी मुख्यमंत्र्यांकडून अहवाल मागवावा, अशी मागणी विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केली. २४ मार्च या दिवशी देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली भाजपच्या शिष्टमंडळाने राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट घेऊन महाविकास आघाडीच्या १०० अपयशांची सूची राज्यपालांकडे देऊन त्याविषयी अहवाल मागवावा, अशी मागणी केली. या वेळी प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींशी बोलतांना फडणवीस यांनी वरील वक्तव्य केले.
या वेळी देवेंद्र फडणवीस म्हणाले, ‘‘या प्रकरणात काँग्रेसही मौन बाळगत आहे. यासाठी काँग्रेसला किती हिस्सा मिळतो, हे त्यांनी घोषित करावे. राज्यात काँग्रेसला कोणतीही भूमिका नाही.’’ या वेळी सुधीर मुनगंटीवार, विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर, मुंबईचे शहराध्यक्ष आमदार मंगलप्रभात लोढा यांसह अन्य नेते उपस्थित होते.