परात्पर गुरु पांडे महाराज यांच्याविषयी श्री. सुरेश सावंत यांना जाणवलेली सूत्रे !

परात्पर गुरु पांडे महाराज

१. परात्पर गुरु पांडे महाराज आश्रम परिसरात फेरफटका मारत असतांना त्यांच्यातील दैवी गुणांचे झालेले दर्शन

१ अ. लहान-मोठ्या सर्वांना नमस्कार करून त्यांची विचारपूस करणे : ‘परात्पर गुरु पांडे महाराज प्रतिदिन सायंकाळी ६.४५ ते ७.१५ या वेळेत देवद आश्रम परिसरात फेरफटका मारायचे. खोलीतून बाहेर पडल्यावर लहान-मोठे जे कुणी साधक त्यांना मार्गात भेटायचे, त्या प्रत्येकाला ते नमस्कार करायचे, त्यांची विचारपूस करायचे आणि त्यांना साधनेविषयी मार्गदर्शन करायचे.

श्री. सुरेश सावंत

१ आ. आश्रम ही हिंदु राष्ट्राची प्रतिकृती असल्याने आश्रम परिसरातील कचरा उचलण्यास सांगणे : परिसरात फिरतांना मार्गात कचरा, कागद किंवा काठ्या दिसल्यास मला त्या उचलण्यास सांगायचे. प्रारंभी मला माझ्यातील अहंमुळे हे कठीण जात होते. माझ्या मनाचा संघर्ष होत असे. परात्पर गुरु महाराजांच्या हे लक्षात येत असे. त्यामुळे ते जाणीवपूर्वक कचरा किंवा कागद असल्यास सांगत. ‘आपला परिसर स्वच्छ असायला हवा’, असे त्यांना वाटायचे. ते म्हणायचे, ‘‘आपण आश्रमात राहतो. आश्रम ही हिंदु राष्ट्राची प्रतिकृती आहे. त्यामुळे आपली प्रत्येक कृती आदर्श असायला हवी.’’ ‘हिंदु राष्ट्र आले आहे कि यायचे आहे ?’ असे ते साधकांना विचारायचे. तेव्हा साधक ‘यायचे आहे’, असे सांगायचे. तेव्हा महाराज म्हणायचे, ‘‘साधकांसाठी हिंदु राष्ट्र आले आहे. समाजासाठी हिंदु राष्ट्र यायचे आहे.’’

बर्‍याचदा परिसरात कचरा असल्यास संबंधित उत्तरदायी साधकाला सांगून तो कचरा काढायला सांगायचे. मार्गात दोरी किंवा अन्य साहित्य असल्यास ते हालवण्यास सांगून ते व्यवस्थित करून घ्यायचे.

१ इ. परिसरातील वस्तू अयोग्य प्रकारे ठेवल्या असल्यास त्या व्यवस्थित करून घेणे : परात्पर गुरु महाराज ‘परिसरातील प्रत्येक वस्तू व्यवस्थित ठेवली आहे का ?’, हे पहायचे, उदा. परिसरात फ्लेक्स दिसल्यास तो व्यवस्थित ठेवला आहे का ? त्याची नीट घडी घातली आहे का ?’ घडी व्यवस्थित नसल्यास ती व्यवस्थित करून घ्यायचे.

१ ई. ‘चपला ठेवू नये’, असा फलक लावलेल्या ठिकाणी एका साधकाने चप्पल ठेवलेली पाहून त्याला त्याच्या चुकीची जाणीव करून देणे : आश्रमाच्या इमारतीच्या प्रवेशद्वारातून बाहेर पडतांना एका बाजूला ‘चपला ठेवू नये’, असा फलक लावला आहे. बर्‍याचदा या जागी साधक चपला ठेवायचे. त्या वेळी महाराज त्या चुकीची जाणीव करून द्यायचे. एका साधकाने त्याची चप्पल त्या जागी ठेवली होती. महाराजांनी त्याला जवळ बोलावले. त्याला फलक वाचायला सांगितला. त्या साधकाने तो फलक वाचल्यावर ‘ही चप्पल कुणाची आहे ?’, असे महाराजांनी त्या साधकाला विचारले. त्याने ‘माझी आहे’, असे सांगितल्यावर ‘कार्यपद्धतीचे पालन झाले का ?’, असे विचारून महाराजांनी त्याला ‘हिंदु राष्ट्रात कसे असणार ?’, याची जाणीव करून दिली.

१ उ. विमनस्क अवस्थेतील साधकाला बोलावून त्याची अडचण समजून घेऊन त्याला मार्गदर्शन करणे आणि त्याच्यासाठी नामजपादी उपाय करणे : एखादा साधक विमनस्क दिसल्यास महाराज त्याला जवळ बोलवायचे, त्याची विचारपूस करायचे आणि त्याची अडचण समजून घ्यायचे. ‘आपण परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे साधक आहोत. आपण हसत-खेळत रहायला पाहिजे. आपण दुःखी असलो, तर त्यांना वाईट वाटणार’, असे ते सांगायचे. त्या साधकाला त्रास होत असल्यास त्याच्यासाठी नामजपादी उपाय करायचे.

२. साधकाला होत असलेल्या त्रासाप्रमाणे मंत्रजप शोधून देणे आणि मंत्रोपचाराच्या संदर्भातील वैशिष्ट्यपूर्ण अनुभूती

२ अ. साधकांनी त्रासांच्या संदर्भात पाठवलेल्या धारिकांचा बारकाईने अभ्यास करून त्यांना मंत्रजप शोधून देणे : परात्पर गुरु महाराज यांच्याकडे मध्यम किंवा तीव्र त्रास असणार्‍या साधकांना होत असलेले त्रास लिहून दिलेल्या धारिका यायच्या. ज्या साधकांची शारीरिक स्थिती गंभीर आहे, अशा साधकांचे त्रास आणि त्यांना असलेले गंभीर आजार, या संदर्भातील धारिकाही यायच्या. या धारिकांचा परात्पर गुरु महाराज बारकाईने अभ्यास करायचे आणि त्या साधकाला होत असलेल्या त्रासाप्रमाणे मंत्र शोधून द्यायचे.

२ आ. ४० वर्षांपासून होणारा पोटदुखीचा त्रास परात्पर गुरु पांडे महाराज यांनी सांगितलेल्या मंत्रजपाने बरा होणे : सावंतवाडी, सिंधुदुर्ग येथील श्रीमती सुशीला धुरी यांना गेल्या ४० वर्षांपासून पोटदुखीचा त्रास होत होता. त्यांना जेवल्यावर कळा मारून शौचाला होत असे. त्यांनी अनेक वैद्यांकडे उपचार केले, तसेच मोठ्या रुग्णालयात उपचार घेतले, तरी त्यांचा आजार बरा झाला नव्हता. त्यांची धारिका आल्यावर महाराजांनी त्यांना मंत्रोपचार सांगितले. ६ – ७ मासांनंतर त्यांचा त्रास उणावला. श्रीमती धुरी यांना वाटत होते, ‘सनातनचे साधक मला बरे करणार.’ त्यांची तशी श्रद्धा होती. त्यामुळे परात्पर गुरु महाराजांनी सांगितलेले सर्व मंत्रोपचार आणि अन्य उपाय त्यांनी श्रद्धापूर्वक केले. त्यामुळे त्यांची पोटदुखी थांबली.

२ इ. ६ वर्षांच्या बोलता न येणार्‍या एका मुलाला परात्पर गुरु महाराज यांनी सांगितलेल्या मंत्रजपाने बोलता येणे आणि त्याने योग्य प्रतिसाद देणे : मिरज येथील कु. अर्जुन पुजारी हा ६ वर्षांचा असतांना त्याला बोलता येत नसे. त्याला शब्दांचा उच्चार करता येत नसे, तसेच त्याला प्रश्‍न विचारल्यास प्रतिसाद देता येत नसे. त्याला अभ्यासात गती नव्हती. तो सतत किरकिर करायचा. परात्पर गुरु महाराज यांच्या मंत्रोपचाराने आता तो बोलायला लागला आहे. तो विचारलेल्या प्रश्‍नांची उत्तरे देतो आणि प्रतिसादही देतो.

२ ई. साधकाला आणि त्याच्या कुटुंबियांना मंत्रोपचार सांगणे आणि उपाय सांगून त्यांचा त्रास न्यून करण्यासाठी पुष्कळ श्रम घेणे : मला स्वतःला आणि कुटुंबातील सर्व सदस्यांना तीव्र आध्यात्मिक त्रास आहे. त्या सर्वांना परात्पर गुरु महाराज यांनी मंत्रोपचार सांगितले आणि उपाय सांगून त्यांचा त्रास न्यून करण्यासाठी पुष्कळ श्रम घेतले. त्यासाठी आम्ही सावंत कुटुंबीय परात्पर गुरु महाराज यांच्या चरणी कोटीशः कृतज्ञ आहोत.

३. परात्पर गुरु महाराज यांना मंत्र तोंडपाठ असणे

परात्पर गुरु महाराज यांनी त्यांच्याजवळ एक लहान वही ठेवली आहे. त्या वहीतील मंत्र ते प्रतिदिन म्हणतात. त्या वहीतील बरेच मंत्र त्यांना तोंडपाठ आहेत.

४. साधकांना मंत्रजप सांगतांना परात्पर गुरु पांडे महाराज यांचा भाव

४ अ. ‘मला काही येत नाही, परात्पर गुरु डॉ. आठवलेच सर्वकाही करवून घेत आहेत’, असा भाव असणे : त्रास असलेल्या साधकाला मंत्र सांगतांना ‘परात्पर गुरु डॉ. आठवलेच त्याला मंत्र सांगत आहेत’, असा महाराजांचा भाव असायचा. अथर्ववेद किंवा अन्य आध्यात्मिक ग्रंथ यांतून मंत्र शोधतांना साधकाच्या व्याधीप्रमाणे नवीन मंत्र मिळायचे. महाराज म्हणायचे, ‘‘परात्पर गुरु डॉक्टर जसे सुचवतील, तसे मी करतो. मला काहीच करावे लागत नाही. तेच नवनवीन मंत्र शोधून देतात. मी केवळ त्यांची कृपा पहातो. मला काही येत नाही. सर्वकाही परात्पर गुरु डॉ. आठवलेच करवून घेतात.’’

४ आ. आजारी असलेल्या साधकाला तातडीने मंत्रजप सांगणेे आणि ‘त्या साधकाची सेवा म्हणजे परात्पर गुरु डॉ. आठवले यांचीच सेवा आहे’, असा परात्पर गुरु महाराज यांचा भाव असणे : एखाद्या साधकाला त्रास होत असल्याचे कळल्यावर ती जेवणाची किंवा रात्री झोपण्याची वेळ असेल, तर वेळेकडे महाराजांचे लक्ष नसायचे. ‘त्या साधकाला मंत्र सांगून त्याचा आजार बरे होणे आवश्यक आहे. तो परात्पर गुरु डॉ. आठवले यांचा साधक आहे. त्या साधकाची सेवा म्हणजे परात्पर गुरु डॉ. आठवले यांचीच सेवा आहे’, असे त्यांना अंतर्मनापासून वाटायचे. त्याप्रमाणे महाराज त्याला तातडीने मंत्रजप सांगायचे, त्याचा पाठपुरावाही घ्यायचे आणि त्याचा प्रतिदिन आढावा घ्यायचे.

५. परात्पर गुरु पांडे महाराज यांनी साधकाची आठवण काढल्यावर तो पुढच्याच क्षणी त्यांच्यासमोर येऊन उभा रहाणे

रात्पर गुरु महाराज यांनी एखाद्या साधकाची आठवण काढली आणि त्याला बोलावण्यास सांगितले, तर तो साधक पुढच्याच क्षणी त्यांच्यासमोर यायचा, उदा. एकदा सायंकाळी परात्पर गुरु महाराज यांनी श्री. शंकर नरुटे यांना बोलावण्यास सांगितले. मी त्यांना भ्रमणभाष केला असता तो लागला नाही. तसे मी परात्पर गुरु महाराज यांना सांगणार, इतक्यात शंकरदादा आले.

६. परात्पर गुरु पांडे महाराज यांचा दात काढल्यावर त्यांनी एकही वेदनाशामक गोळी न घेणे आणि याचे दंतवैद्यांना पुष्कळ आश्‍चर्य वाटणे

परात्पर गुरु महाराजांच्या दातांवर उपचार चालू होते. परात्पर गुरु महाराजांची एक दाढ काढली होती. दाढ काढल्यावर वेदनाशामक गोळ्या घ्याव्या लागतात. गोळ्यांचा कोर्स चालू ठेवावा लागतो. परात्पर गुरु महाराजांनी २ – ३ दिवस गोळ्या घेतल्या; पण एकही वेदनाशामक गोळी घेतली नाही. उपचार करणार्‍या दंतवैद्यांना याचे पुष्कळ आश्‍चर्य वाटले.

७. सतत परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या अनुसंधानात असणे

परात्पर गुरु महाराज सतत परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या अनुसंधानात असायचे. त्यांना ते अनुभवायचे. ते परात्पर गुरु डॉक्टरांशी सूक्ष्मातून बोलायचे. ते त्यांच्याशी पूर्णपणे एकरूप झाल्याचे जाणवायचे.’

– श्री. सुरेश सावंत, सनातन आश्रम, देवद, पनवेल. (वर्ष २०१९)

प.पू. भक्तराज महाराज यांच्या प्रतिमेला वाहिलेल्या दोन फुलांपैकी एक फूल आरतीच्या वेळी प.पू. भक्तराज महाराज यांच्या प्रतिमेच्या खाली असलेल्या चरणपादुकांच्या पेटीवर आपोआप पडणे

प.पू. भक्तराज महाराज

‘१२.११.२०२० या दिवशी ध्यानमंदिरात सायंकाळची आरती चालू होती. त्या वेळी ‘ज्योतसे ज्योत जगावो…’ ही आरती चालू असतांना प.पू. भक्तराज महाराज (प.पू. बाबा) यांच्या प्रतिमेला वाहिलेल्या दोन फुलांपैकी एक फूल प.पू. भक्तराज महाराज यांच्या प्रतिमेच्या खाली असलेल्या चरणपादुकांच्या पेटीवर आपोआप पडले. ते पाहून आरतीला उपस्थित सर्व साधकांचा भाव जागृत झाला. त्या वेळी तेथे सर्वांनाच प.पू. बाबांचे अस्तित्व जाणवले. ‘आश्रमातील सर्वांवर प.पू. बाबांची कृपादृष्टी असून ते सतत सर्व साधकांच्या समवेत आहेत’, असे मला जाणवले. त्या रात्री उशिरापर्यंत मला भावस्थितीत रहाता आले. याविषयी मी प.पू. भक्तराज, परात्पर गुरुदेव आणि भगवान श्रीकृष्ण यांच्या चरणी कोटीशः कृतज्ञता व्यक्त करतो.’

– श्री. सुरेश सावंत, सनातन आश्रम, देवद, पनवेल. (१३.११.२०२०)

परात्पर गुरु पांडे महाराज यांचे अनमोल विचारधन

आत्मज्ञान

‘जे अज्ञात आहे, म्हणजे सध्या ज्ञात नाही, आठवत नाही’, असे आत्मज्ञान सत्संग, सेवा यांद्वारे तात्पुरते आवरण निघाल्यामुळे (तात्पुरते) प्राप्त झाल्यासारखे वाटते. हे आवरण कायमस्वरूपी काढण्याचा प्रयत्न येथे (आश्रमात) चालू आहे, उदा. संगणकाच्या ‘हार्ड-डिस्क’मध्ये माहिती आहे; मात्र ती त्याविषयी माहिती नसणार्‍याला अज्ञात आहे. जेव्हा आपण योग्य कळ दाबतो, आज्ञा देतो, तेव्हा ती प्रकट होते, दृश्य स्वरूपात येते. यालाच ज्ञान / आत्मज्ञान म्हणतात.’ – परात्पर गुरु पांडे महाराज (२७.८.२०१४)

येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक