वैभववाडी – बाजारपेठेत आता हापूस आंब्यांची आवक चालू झाली आहे. ग्राहकांकडून हापूस आंब्याला मोठी मागणी असते. याचा अपलाभ उठवत आता काही व्यापार्यांकडून हापूस आंब्याच्या नावाखाली दुय्यम प्रतीचा हापूससदृश आंबा विकून ग्राहकांची फसवणूक केली जात आहे. त्यामुळे हापूस आंबा उत्पादक शेतकर्यांना लाभ होत नाहीच, तसेच ग्राहकांचीही फसवणूक होते. त्यामुळे ग्राहकांची फसवणूक करणार्या व्यापार्यांवर कारवाई करावी, अशी मागणी ग्राहक पंचायतीच्या कोकण विभागातील सिंधुदुर्ग शाखेने जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी यांच्याकडे ई-मेलद्वारे केली आहे.
ग्राहक पंचायतीने केलेल्या अन्य मागण्या
१. सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगड, ठाणे आणि पालघर या ५ जिल्ह्यांतील हापूस उत्पादक शेतकर्यांना ‘हापूस आंबा’ हा शब्द वापरून त्याची विक्री करण्याचा अधिकार कायद्याने प्राप्त झाला आहे. त्यामुळे इतरत्रच्या आंबा उत्पादकांनी ‘हापसू आंबा’ हा शब्द वापरून आंब्याची विक्री करणे नियमबाह्य आहे.
२. उपरोक्त ५ जिल्ह्यांतील आंबा उत्पादकांची लेखी मागणी आल्याशिवाय ‘देवगड किंवा रत्नागिरी हापूस आंबा’ या नावाचा वापर करून आगाऊ बॉक्स सिद्ध करणार्या कारखान्यांची, तसेच व्यापार्यांची पहाणी, तसेच तपासणी करावी अन् त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करावी.
३. घाऊक, तसेच किरकोळ फळविक्रेत्यांची, तसेच उत्पादित मालाची विक्री करणार्यांचीही पहाणी करून त्यांच्यावर कारवाई करावी.
४. वरील मागण्यांसह अन्य मागण्यांची ८ दिवसांत शासकीय स्तरावरून सरकारी अधिवक्त्यांचा समादेश घेऊन कारवाई चालू करावी. यामध्ये विलंब झाल्यास आंबा उत्पादक शेतकर्यांची हानी आणि ग्राहकांची होणारी फसवणूक यास प्रशासन उत्तरदायी असेल. तसेच ‘हे या कार्यालयाचे काम नाही’, असे सांगून टाळाटाळ करू नये.
५. या पत्राच्या प्रती मुख्यमंत्री; पोलीस अधीक्षक, सिंधुदुर्ग; कुलगुरु, डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ, दापोली; साहाय्यक आयुक्त अन्न आणि औषध प्रशासन, सिंधुदुर्ग आदींना पाठवण्यात आल्या आहेत.