१. दळणवळण बंदी लागू करण्यात आल्यावर समाजातील अनेकांची मनस्थिती अत्यंत बिकट होणे; परंतु साधक मात्र आनंदी असून त्यांनी साधनेचे प्रयत्न वाढवण्यासह सामाजिक माध्यमांद्वारे अध्यात्मप्रसाराचे कार्यही करणे
‘कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी दळणवळण बंदी लागू करण्यात आली होती. यामुळे सर्व व्यवहार ठप्प होऊन कुटुंबातील सर्वांना घरीच थांबावे लागत होते. एकूण परिस्थिती आपत्काळ दर्शवणारीच आहे. या काळात समाजातील अनेकांची मनस्थिती अत्यंत बिकट झाली होती. असे असले, तरी सनातनचे साधक मात्र आनंदी असून त्यांनी स्वतःच्या व्यष्टी साधनेचे प्रयत्न वाढवण्यासह ते समष्टी साधना, म्हणजेच अध्यात्मप्रसाराचे कार्य सामाजिक माध्यमांद्वारे करत आहेत.
२. भाववृद्धी सत्संगातून श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ साधकांना भावाचे ज्ञानामृतच देत असून साधकांनी आपत्काळात तरून जाण्यासाठी आवश्यक ते आध्यात्मिक गुण साध्य करण्याच्या प्रयत्नांविषयीही मार्गदर्शन करणे
या आपत्काळाला सामोरे जात असतांना ‘भगवान श्रीकृष्णाचे अनुसंधान साधून स्वतःमध्ये कृतज्ञताभाव, शरणागती, गोपीभाव आणि दास्यभक्ती वाढवणे, आज्ञापालन करणे, सर्वकाही देवावर सोपवणे, सातत्याने गुरुस्मरण करणे अन् ‘आपत्काळात देवच तारून नेणार आहे’, असा भाव ठेवणे’ इत्यादी साधकांना साध्य करायचे आहे. ते करण्यासाठी भाववृद्धी सत्संग हे सर्वोत्कृष्ट माध्यम आहे. दळणवळण बंदी लागू केल्यानंतर घेण्यात येत असलेल्या भाववृद्धी सत्संगांतून श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ साधकांना भावाचे ज्ञानामृतच देत आहेत. ‘सध्या चालू असलेल्या आणि येणार्या भावी आपत्काळात तरून जाण्यासाठी भगवंताचे अनुसंधान अन् वरील आध्यात्मिक गुण साध्य करण्यासाठी साधकांनी कोणते प्रयत्न करायला हवेत ?’, याविषयी त्या मार्गदर्शन करतात.
३. साधकांमध्ये भावजागृतीचे प्रयत्न वाढण्यासह आपत्काळाला सामोरे जाण्याचे आध्यात्मिक बळ मिळण्यासाठी करावयाच्या प्रयत्नांना दिशा मिळणे
या सर्वांमुळे साधकांमध्ये भावजागृतीचे प्रयत्न वाढण्यासह येणार्या आपत्काळाला सामोरे जाण्याचे आध्यात्मिक बळ मिळण्यासाठी आणि भगवान श्रीकृष्णाची कृपा संपादन करण्यासाठी करावयाच्या प्रयत्नांना दिशा मिळत आहे. त्यामुळे ‘आताच्या काळात श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदाताई यांच्या रूपात परात्पर गुरु डॉ. आठवले आणि भगवान श्रीकृष्णच भाववृद्धी सत्संगाच्या माध्यमातून ‘आपत्काळातील संजीवनी’च साधकांना देत आहेत’, असेच जाणवते. त्यामुळे भगवान श्रीकृष्ण, परात्पर गुरु डॉ. आठवले आणि श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदाताई यांच्या चरणी ‘कृतज्ञता’ हा शब्दच अपुरा आहे.’
– श्री. भूषण कुलकर्णी, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा.
• येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |