१. परात्पर गुरुदेवांचीच सेवा करत असल्याचा भाव ठेवून यजमानांची सेवा करणे
‘मी वर्ष २००८ पासून सनातन संस्थेच्या मार्गदर्शनानुसार साधना करू लागले. प्रारंभी मी नामजप आणि कधीतरी सेवा करायचे. हळूहळू नामजपात वाढ झाली. सत्संग आवडायला लागला. एकदा माझ्या यजमानांना अपघात झाला. एक मास ते रुग्णालयात होते. घरी आल्यावर त्यांना हृदयविकाराचा झटका येऊन २२.९.२०१० या दिवशी त्यांचे निधन झाले. त्यांची सेवा करत असतांना माझ्या मनात सतत ‘मी परात्पर गुरुदेवांचीच सेवा करत आहे’, असा भाव असायचा.
२. यजमानांचे निधन झाल्यावर दोन्ही मुलांचे दायित्व आल्याने ताण येऊन चिडचिड होणे आणि हळूहळू स्वभावात पालट करण्याचा प्रयत्न करणे
यजमान गेल्यावर माझ्या दोन्ही मुलांचे दायित्व माझ्यावर आले. त्या वेळी मला ताण यायचा. माझ्या मनाची पुष्कळ चिडचिड होत असे. मला पुष्कळ राग यायचा. नंतर मी हळूहळू माझ्या स्वभावात पालट करण्याचा प्रयत्न केला.
३. गुरुदेवांच्या कृपेने बांधलेल्या घराला आश्रम समजणे आणि गुरुदेवांच्या कृपेनेच मुलांना हवे ते शिक्षण मिळणे
हे गुरुमाऊली, आम्हाला घर नव्हते. पडलेले होते. तुमच्याच कृपेने मी घर बांधले. मी त्या घराला आश्रमच समजते. गुरुमाऊली, ते तुमचेच घर आहे. १२वी च्या परीक्षेनंतर माझ्या मुलाची वैद्यकीय अभ्यासक्रमाला जाण्याची इच्छा होती; पण देवा, पैशाची अडचण होती, तसेच त्याला लांब पाठवायची माझी सिद्धता नव्हती. मी तुम्हाला प्रार्थना करायचे. गुरुमाऊली, तुमच्या कृपेनेच त्याला वैद्यकीय शिक्षण (BHMS) घेण्यास जवळ म्हणजे सोलापूरला प्रवेश मिळाला अन् मुलीनेही अभियांत्रिकी अभ्यासक्रमाची पदवी प्राप्त केली. गुरुदेवा, ही केवळ तुमचीच कृपा आहे.
४. संत भेटणार असे समजल्याने डोळ्यांतून आनंदाश्रू वाहणे आणि डोळे बंद केल्यावर सुगंधाची अनुभूती येणे
‘आम्हाला एक संत भेटणार आहेत’, हे कळल्यावर मला पुष्कळ आनंद झाला. माझ्या डोळ्यांतून आनंदाश्रू वाहू लागले. मी डोळे बंद करून दीर्घ श्वास घेतला. तेव्हा मला सुगंधाची अनुभूती आली. त्या संतांचा आम्हाला सत्संग मिळाला, यासाठी आम्ही कृतज्ञ आहोत.’
– श्रीमती मनीषा धनंजय आंबेकर, भाळवणी, अकलूज. (१२.११.२०१९)
या लेखात प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या भाव तेथे देव या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |