गोवा सायबर गुन्हे विभागाकडून खलाशांसाठीचे बनावट नोकरभरतीचे रॅकेट उघडकीस

गुवाहाटी येथील प्रमुख संशयित सुमित उपाध्याय कह्यात

पणजी, १४ मार्च (वार्ता.) – गोवा सायबर गुन्हे विभागाने गोवास्थित एका आस्थापनाच्या नावाने बनावट संकेतस्थळ सिद्ध करून त्याद्वारे खलाशांसाठी देशस्तरावर राबवले जाणारे बनावट नोकरभरती रॅकेट उघडकीस आणले आहे. या प्रकरणी सायबर गुन्हे विभागाने मूळचा गुवाहाटी येथील प्रमुख संशयित सुमित उपाध्याय याला मंबुई येथील विमानतळावरून कह्यात घेतले आहे.

वास्को येथील ‘ओवर्ट मॅरिटाईम्’ या आस्थापनाच्या नावाने एक बनावट संकेतस्थळ सिद्ध करून त्याद्वारे इच्छुक उमेदवारांना बनावट नोकरभरती पत्रे वितरित केली जात आहेत, अशी तक्रार सायबर गुन्हे विभागाकडे आली होती. त्यानंतर सायबर गुन्हे विभागाने ही कारवाई केली. या प्रकरणी नोकरीसाठी इच्छुक उमेदवारांकडून ५ लाख रुपये शुल्क आकारले जात होते, तसेच फसवणूक झालेल्या अनेक उमेदवारांनी ‘डी जी शिपिंग’कडे तक्रारी प्रविष्ट केल्या आहेत. पोलीस सूत्रानुसार संशयित सुमित उपाध्याय याने अनेक बनावट ओळखपत्रे, सीमकार्ड आदींचा वापर करून उत्तरप्रदेश, देहली, मुंबई आणि गुवाहाटी या ठिकाणी प्रवास केला आहे.