भारतीय महिलांच्या विवाहबाह्य संबंधांची खोटी आकडेवारी घोषित करणार्‍या ‘अ‍ॅप’वर बंदी घाला !

शिवसेनेच्या आमदारांची महाराष्ट्राच्या विधान परिषदेत मागणी

डॉ. मनीषा कायंदे

मुंबई, ८ मार्च (वार्ता.) – जगातील महिलांच्या सर्व्हेक्षणातून भारतातील ४८ टक्के महिलांचे विवाहबाह्य संबंध असल्याची खोटी आकडेवारी घोषित करत भारतीय महिलांची अपकीर्ती करणार्‍या फ्रान्समधील ‘फ्रेंच एक्स्ट्रा मॅरिटल डेटिंग अ‍ॅप’वर बंदी घालावी, अशी मागणी शिवसेनेच्या आमदार डॉ. मनीषा कायंदे यांनी केली. जागतिक महिला दिनाच्या पार्श्‍वभूमीवर डॉ. मनीषा कायंदे यांनी वरील सूत्र उपस्थित केले.

१. डॉ. मनीषा कायंदे म्हणाल्या की, हे वृत्त ‘बिझनेस स्टॅन्डर्ड’ मध्ये प्रसिद्ध झाले आहे. मार्केटिंग करण्यासाठी यामध्ये भारतीय महिलांची अपकीर्ती करण्यात आली आहे. त्यामुळे या ‘अ‍ॅप’वर तात्काळ बंदी घालावी.

२. यावर महिला आणि बाल विकासमंत्री अधिवक्त्या यशोमती ठाकूर यांनी ‘महाराष्ट्र शासनाच्या वतीने याविषयी केंद्रशासनाला पत्र लिहून या ‘अ‍ॅप’ वर बंदी घालण्याची मागणी करण्यात येईल’, असे सांगितले.

चिनी ‘अ‍ॅप्स’प्रमाणे या ‘अ‍ॅप’वरही केंद्रशासनाने बंदी घालावी ! – रामराजे नाईक-निंबाळकर, सभापती

या ‘अ‍ॅप’ वर बंदी घालण्याचा अधिकार राज्यशासनाला नसला, तरी शासनाने त्याविषयी केंद्रशासनाकडे मागणी करावी. शासनाने हा विषय गांभीर्याने घ्यावा. केंद्रशासनाने चीनच्या ‘अ‍ॅप्स’वर जशी बंदी घातली, त्याप्रमाणे या ‘अ‍ॅप’वरही शासनाने बंदी घालावी. तसेच हे वृत्त ज्या प्रसिद्धीमाध्यमांनी दिले, त्यांच्याकडे स्पष्टीकरण मागावे.