पुणे, ३ मार्च ( वार्ता.) – पुणे आणि पिंपरी चिंचवड महानगरपालिका यांच्या वतीने गणेशोत्सवाच्या काळात गणेशमूर्तीच्या विसर्जनामुळे होणारे जलप्रदूषण रोखण्यासाठी कृत्रिम हौद बांधून त्यामध्ये मूर्ती विसर्जन करण्याचे आवाहन केले जाते, तसेच काही संघटना मूर्तींचे विसर्जन न करता दान करण्याची अशास्त्रीय मोहीम राबवतात. हे सगळे अशास्त्रीय प्रकार थांबवण्यासाठी आणि प्रथा-परंपरेने गणेशमूर्तींचे शास्त्राप्रमाणे विसर्जन करता येण्यासाठी गणेशोत्सवामध्ये नागरिकांना शाडू मातीच्या गणेशमूर्ती उपलब्ध करून द्याव्यात, अशी मागणी हिंदु जनजागृती समिती आणि हिंदुत्वनिष्ठ संघटनांनी निवेदनाच्या माध्यमातून केली आहे. २६ फेब्रुवारी या दिवशी पुणे येथे पुणे महानगरपालिका आयुक्तांचे स्वीय साहाय्यक श्री. गजानन कडक यांनी निवेदन स्वीकारले. मा. आयुक्तांशी चर्चा करण्यासाठी निमंत्रित करू, असे सकारात्मक आश्वासन दिले. तर १ मार्च या दिवशी पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त श्री. विकास ढाकणे यांनी निवेदन स्वीकारले.