चीनने देप्सांगपासून २४ किमी अंतरावरील चौकीजवळ केले नवीन बांधकाम !

उपग्रहाने काढलेल्या छायाचित्रातून उघड

अशा विश्‍वासघातकी चीनसोबर कुठल्याही प्रकारची चर्चा करणे, हा आत्मघात असून आक्रमक धोरण राबवून त्याला प्रत्युत्तर देणे आवश्यक !

लेह (लडाख) – अक्साई चीनमधील देप्सांग येथे प्रत्यक्ष नियंत्रणरेषेवर चीनने बांधकाम केल्याची माहिती उपग्रहाने काढलेल्या छायाचित्रातून समोर आली आहे. नुकतेच चीनचे पँगाँग तलावाजवळून सैन्य मागे घेतले; मात्र त्याच्या कुरापती थांबलेल्या नाहीत, हे यातून पुन्हा उघड झाले आहे. भारतातील सर्वांत उंचावरील हवाई तळ असलेल्या लडाखमधील दौलत बेग ओल्डीपासून २४ किमी अंतरावर हे बांधकाम करण्यात आले आहे. विशेष म्हणजे गलवान खोर्‍यात झालेल्या भारत आणि चीन सैन्यांच्या संघर्षानंतर हे बांधकाम करण्यात आले आहे.

(सौजन्य : India Today)

येथे चिनी सैन्याची चौकी आहे. वर्ष १९६२ च्या युद्धानंतर येथे ही चौकी उभारण्यात आली होती; मात्र मागील काही वर्षांपासून येथे सातत्याने बांधकाम केले जात आहे. चौकीच्या मुख्य इमारतीजवळ बांधकाम करण्यात आले आहे. हे ऑगस्ट २०२० पासून चालू आहे. येथे रणगाडे आणि सैनिक यांना तैनात केले आहे. तसेच सोलर पॅनल्स, अँटेना टॉवर, डिफेन्स सिस्टीम आणि भिंत बांधण्यात आली आहे. या परिसरात अनेक निवासगृहेही उभारण्यात आली आहेत.