पूज्य (ह.भ.प.) सखाराम बांद्रे महाराज यांनी कुटुंबाविषयी केलेले अनमोल मार्गदर्शन !

पू. (ह.भ.प.) सखाराम बांद्रे महाराज

१. कुटुंब केवढे हवे ?

१ अ. ‘हम दो हमारे दो’ योग्य असणे : पोरे झालेली बघून कामवासनेचा कारखाना किती जोरात चालवला असेल, हे पहायला आरसा कशाला हवा ? पहाताच त्याचा संसार समजतो. परिस्थिती बिघडली आहे. अंगावर बनियन (‘बॉडी’) मिळेनासे झाले. पोरांचे आणि आपले हाल; म्हणून ‘हम दो हमारे दो’ योग्य (बरोबर) आहे. सावधान !’

२. मोठ्यांचे आचरण आदर्श असण्याचे महत्त्व

२ अ. घरचा चोर ! : ‘तुम्ही तुमच्या वडिलांना लुबाडले, तर तुमचा मुलगा तुमची मालमत्ता लुबाडेल ! हा घरचा चोर आहे ! काही बाहेरचे चोरही असतात. दानधर्म कराल, तेवढेच तुमच्या समवेत येतात. बाकी काही नाही. ‘तुमच्या मृत्यूनंतर लोक तुम्हाला जाळून राख करणार’, याची आठवण नाही का ?’

२ आ. रामायणातील बंधूप्रेम आणि महाभारतातील भावांमधील वैर ! : ‘काही घरांत भावंडामध्ये पुष्कळ प्रेम, तर काही घरांत भावंडामध्ये शत्रुत्व असते. बंधूप्रेम पहावे, तर रामायणामध्ये आणि क्रूर अन् घातकी भाऊ पहावे महाभारतामध्ये !’

२ इ. ‘खाण तशी माती’, हे प्रत्येक वेळी लागू न होणे : ‘खाण तशी माती’, अशी म्हण आहे; परंतु सगळीच मुले वडिलांसारखी जन्माला येत नाहीत. एखादाच वडिलांसारखा उगवतो (जन्म घेतो) आणि पिसाट लोकातून (भूत योनीतून) जन्माला येतो, तो पिसाटासारखा वागतो.’

३. आई-वडील, संत आणि देव यांची सेवा करण्याचे लाभ

३ अ. आई-वडील, संत आणि देव यांची सेवा केल्यामुळे पुण्य मिळणे : ‘संसार केल्याने केवळ पोट भरते, पुण्य मिळत नाही. संत आणि देव यांची सेवा केल्याने पुण्य मिळते. बायकोची सेवा केल्याने पुण्य मिळत नाही; परंतु आई-वडिलांची सेवा केल्याने निश्‍चित पुण्य मिळते. पुंडलिकाने आई-वडिलांची सेवा केली; म्हणूनच पांडुरंग त्याला भेटायला पंढरपुरात आला. एवढे आई-वडिलांच्या सेवेतून पुण्य लाभते.’

३ आ. आई-वडिलांची सेवा केल्यामुळे मोठे पुण्य मिळणे : आम्ही मेल्यावर आमच्या चितेला आग लावून राख करतो, त्याचे नाव चिरंजीव (मुलगा). आम्ही हाडाची काडे करून मिळवले, ते तो फुकट अन् सहज घेतो, त्याचे नाव चिरंजीव (मुलगा). जगाचा खास न्याय ! परंपरा पहा ! पुत्राला सगळे दिले आणि माझ्या गाठीला पुण्य मिळाले, असे कुठल्याच ग्रंथात लिहिलेले नाही; मात्र आई-वडिलांची सेवा केली, तर पुण्य मिळते. बायको-पोरांची सेवा केल्यावर पुण्य मिळते, असे कुठल्याच साधूसंतांनी सांगितलेेले नाही; परंतु भूदान, वस्त्रदान, अन्नदान आणि ज्ञानदान केले, तर पुण्य मिळते.’

४. पत्नीची निवड आणि पुरुषाचे तिच्याशी वागणे

४ अ. पत्नीची निवड करतांना सहस्र वेळा विचार करावा ! : शंभर कामे सोडून प्रथम स्नान करावे. ५० कामे सोडून आधी वेळेवर जेवण करावे. सहस्रो कामे बाजूला टाकून सत्संग मिळवावा. १०० वेळा विचार करून घर बांधावे. घर बांधण्यापूर्वी ‘त्या भूमीला पाणी आहे का ?’, ते प्रथम पहावे. त्याचप्रमाणे पत्नीची निवड करतांना सहस्र वेळा विचार करावा. निवड करतांना कुठे चूक झाली, तर जन्मभर पश्‍चात्ताप करण्याची वेळ येते. पत्नी प्रथम चंद्रमुखी असते. मुले झाल्यावर सूर्यमुखी होते आणि म्हातारपणी ज्वालामुखी होते. पत्नी कर्कशा मिळाली, तर म्हातारपणी जुने प्रसंग उकरत बसते आणि भांडण करते. त्यामुळे आपण दुःखी कष्टी होतो. ती काय म्हणते पहा, ‘‘तुम्ही कसे आहात ?’, ते मी ओळखून आहे. मी म्हणून तुमच्या जवळ राहिले. दुसरी असती, तर तुम्हाला केव्हाच सोडून गेली असती. पहिल्या मुलाच्या वेळी मी १०० मेथीचे लाडू खाल्ले. दुसर्‍या मुलाच्या वेळी तुम्ही मला ५० लाडू दिलेत. तिसर्‍या मुलाच्या वेळी तुम्ही २५ लाडूच दिलेत आणि चौथ्या बाळंतपणात काहीच दिले नाहीत.’’ पैशाची विहीर आहे का ? बिचारा नवरा कुठून देणार इतके लाडू ?’

४ आ. घरची लक्ष्मी दुःखी झाल्यास सर्व सुखे पळून जाणे : ‘बायकोशी वाकडे वागतो, तो खाई चुलीची लाकडे’; म्हणून बायकोशी भांडण करू नये. घरात लक्ष्मी दुःखी झाली, तर सर्व सुखे पळून जातात.’

४ इ. स्त्रीचा शाप : ‘स्त्रीला, सौभाग्यवतीला पुरुषाकडून मारझोड होते, तेव्हा ती अश्रू गाळते. हा ती शापच देत असते. पुरुषाने जरी स्त्रीला हाकलून किंवा लग्न झालेल्या बाईला पिटाळून लावले, तरी पुरुष सुखी होणार नाही. काही वेळा स्त्री पुरुषाला सोडून जाते; पण ती कधीही सुखी होत नाही.’

– पूज्य (ह.भ.प.) सखाराम रामजी बांद्रे (वय ७० वर्षे), कातळवाडी, ता. चिपळूण, जिल्हा रत्नागिरी. (पू. सखाराम बांद्रे महाराजयांचे हे लिखाण २००५ ते २०२० या कालावधीतील आहे.)