‘गुरुकृपायोगानुसार साधनेच्या अंतर्गत अष्टांग साधनेसह ‘अनेकांतून एकात येणे’, ‘स्थुलातून सूक्ष्मात जाणे’, ‘व्यक्त भावातून अव्यक्त भावाकडे जाणे’ इत्यादी साधनेचे मूलभूत सिद्धांत (घटक) येतात. ‘साधकाने साधनेमध्ये पुढच्या पुढच्या टप्प्यांकडे जाणे आवश्यक असते’, असे सच्चिदानंद परब्रह्म गुरुदेवांनी सांगितलेले आहे आणि साधकही तसा प्रयत्न करत आहेत. याच अनुषंगाने रामनाथी आश्रमातील श्री. प्रशांत कोयंडे यांनी साधनेच्या मूलभूत तत्त्वांना अनुसरून केलेले प्रयत्न याविषयीची सूत्रे १ जानेवारी २०२५ या दिवशी पाहिली. आज उर्वरित सूत्रे पाहूया.
याच्या आधीचा लेख वाचण्यासाठी पुढील लिंक वर क्लिक करा : https://sanatanprabhat.org/marathi/868969.html
२. व्यक्त भावाकडून अव्यक्त भावाकडे जाणे
२ ई. गुरुदेवांच्या समष्टी कार्याचे रूप अधिक आवडल्याने अव्यक्त भावाचा प्रयत्न करणे : ‘गुरूंविषयीचा व्यक्त भाव आणि त्यांचे स्थूल रूप’ याच्यानंतर ‘गुरूंविषयीचा अव्यक्त भाव आणि त्यांचे समष्टी रूप’ हा पुढचा टप्पा आहे’, असे मला वाटते आणि ‘माझ्या प्रकृतीला ते अधिक योग्य आहे किंवा तेच मला अधिक आनंद देणारे आहे’, असेही मला वाटते. याविषयी चिंतन केल्यावर माझ्या लक्षात आले की, भगवान श्रीविष्णूंनी आतापर्यंत ९ अवतार घेतले आहेत. त्यांपैकी भगवान श्रीराम आणि श्रीकृष्ण यांच्यावर भाविकांकडून अधिक श्रद्धा आणि भाव ठेवला जातो. भगवान श्रीराम आणि श्रीकृष्ण आज स्थूल रूपात नाहीत, तरीही आजही आपण त्यांची भक्ती करून त्यांच्यातील चैतन्याचा लाभ घेत असतो. आपण त्या दोघांचे चरित्र आणि गुण यांतून आदर्श घेऊन तसे वागण्याचा प्रयत्न करतो. आपण त्यांचे विचार कृतीत आणण्याचा प्रयत्न करतो. भगवान श्रीकृष्णाने ‘श्रीमद्भगवद्गीता’ सांगितली. तिचेच पठण सर्वत्र केले जाते आणि त्यानुसार आचरण करण्याचा प्रयत्न केला जातो. ‘श्रीमद्भगवद्गीता’ ही प्रत्येक हिंदूसाठी आदर्श आहे. भगवान श्रीकृष्णाच्या व्यष्टी रूपापेक्षा समष्टीच्या अनुषंगाने त्याची ‘श्रीमद्भगवद्गीता’ आपल्याला अधिक महत्त्वाची आहे. सच्चिदानंद परब्रह्म गुरुदेवांच्या रूपापेक्षा त्यांच्या समष्टी कार्याचे रूप मला अधिक आवडते आणि मला त्यातून अधिक आनंद मिळतो. त्यामुळे माझ्या मनात हा आनंद घेण्याचा विचार अधिक असतो. हा आनंद घेतांना स्वभावदोष आणि अहं हे अडथळे येत असतात. त्यांवर मात करण्याचा प्रयत्न करणे आवश्यक असते. हा व्यष्टी साधनेचा प्रयत्न येथे महत्त्वाचा असतोच.
३. सेवेतून चैतन्य निर्माण होणे
३ अ. ‘दैनिक ‘सनातन प्रभात’चा कक्ष म्हणजे ‘निर्गुण चैतन्याचे उदाहरण’ असल्याचे सच्चिदानंद परब्रह्म गुरुदेवांनी सांगणे : रामनाथी आश्रमातील दैनिक ‘सनातन प्रभात’च्या कक्षाचे वर्ष २०१९ मध्ये नूतनीकरण करण्यात आले होते. त्या वेळी सच्चिदानंद परब्रह्म गुरुदेवांनी कक्षात येऊन ‘आश्रमातील ध्यानमंदिरामध्ये जितके चैतन्य आहे, तितके चैतन्य येथे निर्माण झाले आहे’, असे सांगितले. ‘या कक्षामध्ये देवतांची चित्रे नाहीत. येथे आरतीही केली जात नाही, तरीही नूतनीकरणानंतर चैतन्य कसे निर्माण झाले ?’ असा प्रश्न उपस्थित होतो. तेव्हा ‘ज्या साधकांनी नूतनीकरणाची सेवा केली त्यांचा भाव, नूतनीकरण करतांना येथील बैठक आणि संगणक व्यवस्था यांची काटकोनात केलेली रचना, फर्निचरला असलेला पांढरा रंग, येथे असणार्या दूरचित्रवाणीसाठी अन् बैठक कक्षासाठी स्वतंत्र केबिन यांमुळे येथे निर्गुण स्तरावरील चैतन्य निर्माण झाले आहे’, असे लक्षात आले. आपल्याकडे असलेल्या सेवेमध्ये अशा प्रकारचा विचार करून सेवा करण्याचा प्रयत्न केला, तर त्या सेवेतूनही चैतन्य निर्माण होते, असा अनुभव साधकांनी घेतला असणार.
३ आ. हिंदु राष्ट्रात अनेक सार्वजनिक ठिकाणे दैनिक कक्षासारखी चैतन्यमय करण्याचा प्रयत्न करावा लागणार ! : हिंदु राष्ट्राची स्थापना झाल्यानंतर सर्वत्र असे चैतन्य निर्माण करण्याचा प्रयत्न करावा लागणार आहे आणि तो साधकांना समाजाला सांगावा लागणार आहे. अनेक खासगी आस्थापनांची कार्यालये अत्यंत आधुनिक आणि श्रीमंतीचा थाट असणारी असतात; मात्र तेथे चैतन्य नसते, हे लक्षात घ्यायला हवे. सरकारी कार्यालयांची स्थिती तर न सांगण्यासारखीच आहे. एखाद्या ठिकाणी गेल्यावर ‘आपल्यावर अनिष्ट शक्तींचे (प्रचंड काळे) आवरण (दाब) निर्माण होते’, असे अनुभवायला येते. हिंदु राष्ट्रात अशी सार्वजनिक ठिकाणे दैनिक कक्षासारखी करण्याचा प्रयत्न करावा लागणार आहे. तो कसा करायचा, हे साधकांनी प्रत्यक्ष कृती केली असल्याने त्यांना ठाऊक आहे. त्यांना तो समाजाला सांगावा लागणार आहे.’ (समाप्त)
– श्री. प्रशांत कोयंडे, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (३.२.२०२४)
|