प्रत्येकाने स्वतःमध्ये शौर्य निर्माण होण्यासाठी प्रयत्नशील असायला हवे ! – सुमित सागवेकर

श्री. सुमित सागवेकर

पुणे, २६ फेब्रुवारी (वार्ता.) – सध्या प्रतिदिन महिलांवर अन्याय, अत्याचार आणि बलात्कार होत असल्याच्या बातम्या येत आहेत. हे सर्व थांबवण्यासाठी महिलांनी सक्षम होण्याची आवश्यकता आहे. महिलांकडे वाईट दृष्टीने बघणे, त्यांना विनाकारण धक्के देणे अशी विकृत मानसिकता असणार्‍यांना विरोध करण्यासाठी प्रत्येकानेच स्वतःमध्ये शौर्य निर्माण होण्यासाठी प्रयत्नशील असायला हवे, असे प्रतिपादन हिंदु जनजागृती समितीचे युवा संघटक श्री. सुमित सागवेकर यांनी केले.

२० फेब्रुवारी या दिवशी पार पडलेल्या ‘ऑनलाईन’ ‘शौर्यजागृती’ व्याख्यानात ते बोलत होते. आपल्यावर कोणती वेळ कधी येईल, हे सांगता येणे शक्य नाही. त्यामुळे परिस्थितीचा सामना करण्यासाठी सक्षम होण्याची आवश्यकता असल्याचे त्यांनी या वेळी सांगितले. या व्याख्यानाला अनेक धर्मप्रेमी आणि प्रशिक्षणार्थी उपस्थित होते. व्याख्यानाचा आरंभ श्री गणेशाच्या श्‍लोकाने झाला. व्याख्यानानंतर हिंदु जनजागृती समितीच्या कार्यकर्त्यांनी व्हिडिओच्या माध्यमातून शौर्य जागवणारी प्रात्यक्षिके दाखवली. या वेळी धर्मप्रेमींनी उत्साहपूर्ण घोषणा देऊन स्वतः शौर्यजागृती प्रात्यक्षिके शिकण्याची इच्छा व्यक्त केली. कु. चारुशीला चिंचकर यांनी संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले. व्याख्यानानंतर काही धर्मप्रेमींनी उत्स्फूर्तपणे स्वत:चे अभिप्राय नोंदवले.

निवडक अभिप्राय

१. साक्षी राजपूत, स्वाती शिंदे – सध्याच्या काळात स्वरक्षण शिकण्याची आवश्यकता असून प्रारंभी भीती वाटायची; परंतु आता स्वरक्षण प्रशिक्षण घेत असल्याने भीती नष्ट झाल्याचे सांगितले.

२. प्रसाद येवले – सध्या ‘शौर्य’ हा शब्दच सर्वजण विसरले आहेत. आपले शौर्य सात्त्विक असून तेथे ईश्‍वराचे अधिष्ठान असते.