बळाच्या नव्हे, तर हिंदु धर्माच्या आधारे ‘अखंड भारता’ची निर्मिती शक्य ! – सरसंघचालक डॉ. मोहन भागवत

अखंड भारताच्या आवश्यकतेवर सरसंघचालकांचा भर

भाग्यनगर (तेलंगाणा) – हिंदु धर्माच्या आधारे जगाच्या कल्याणासाठी गौरवशाली ‘अखंड भारता’ची निर्मिती शक्य आहे; मात्र बलपूर्वक असे केले जाऊ शकत नाही. त्यासाठी देशभक्तीच्या भावनेला जागृत करण्याची आवश्यकता आहे, असे प्रतिपादन सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांनी येथे एका पुस्तक प्रकाशनाच्या कार्यक्रमात केले.

सरसंघचालकांनी मांडलेली सूत्रे

१. आपण त्यांना (पाकिस्तान आणि बांगलादेश) दाबण्याची आवश्यकता नाही. त्यांना समवेत जोडण्याविषयी सांगत आहोत. जेव्हा आपण अखंड भारताची गोष्ट करतो, तेव्हा ते शक्तीच्या बळावर साध्य करू इच्छित नाही, तर सनातन धर्माच्या आधारे जोडायचे आहे. सनातन धर्म मानवता आणि संपूर्ण जगाचा धर्म आहे अन् सध्या त्याला ‘हिंदु धर्म’ असे म्हटले जाते. ‘वसुधैव कुटुम्बकम् ।’च्या आधारे जगामध्ये पुन्हा आंनद आणि शांतता निर्माण करता येऊ शकते.

२. आता स्वतःला भारताचा भाग न समजणार्‍या भागांना भारताशी जोडणे अधिक आवश्यक आहे. या देशांनी त्यांना जे शक्य होते, ते सर्व केले; मात्र त्यांना समाधान मिळालेले नाही. त्यांच्या संकटावरील उत्तर म्हणजे भारताशी पुन्हा जोडले जाणे, हे आहे. त्यातून त्यांच्या सर्व समस्या सुटतील.

३. गांधारचे रूपांतर अफगाणिस्तामध्ये झाले, पाकिस्तान निर्माण झाला. तेथे त्यांच्या स्थापनेपासून शांतता आहे का ?

४. फाळणीविषयी नेहरू यांना विचारण्यात आल्यावर त्यांनी ‘हे मूर्खांचे स्वप्न आहे’ असे म्हणत त्याला नाकारले होते. फाळणीपूर्वी ६ मास कुणीही हे मानू शकत नव्हते की, फाळणी होईल; मात्र ती झाली.

५. ब्रिटीश शासनकाळामध्ये लॉर्ड वेव्हेल यांनी त्यांच्या संसदेत म्हटले होते, ‘भारताला देवाने बनवले आहे. त्याची फाळजी कोण करू शकतो ?’ मात्र शेवटी फाळणी झाली. जे अशक्य वाटत होते, ते झाले. यामुळे आताही ‘अखंड भारत’ अशक्य वाटत आहे; मात्र ते शक्य होण्याची शक्यता नाकारता येत नाही; कारण त्याची आज आवश्यकता आहे.