गुलामीच्या मानसिकतेतून लिहिण्यात आलेला इतिहास भारताचा इतिहास नाही ! – पंतप्रधान नरेंद्र मोदी

नव्याने इतिहासाचे लेखन केले जात आहे !

महाराजा सुहेलदेव यांच्या पुतळ्याचे ‘ऑनलाईन’ भूमीपूजन

नवी देहली –  ज्यांनी आपल्या देशाला गुलाम बनवले त्यांच्या दृष्टीतून, तसेच गुलामीच्या मानसिकतेतून लिहिण्यात आलेला इतिहास भारताचा इतिहास नाही. अनेक पिढ्यांपासून सर्वसामान्यांच्या माध्यमातून, भारतातील लोककथांच्या माध्यमातून चालत आलेला इतिहासही भारताचा इतिहास आहे, असे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले. ते बिहारमधील बहाराईचमध्ये श्रावस्ती येथील महाराजा सुहेलदेव यांच्या पुतळ्याच्या ‘ऑनलाईन’ भूमीपूजनाच्या कार्यक्रमात बोलत होते. या वेळेस उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ स्मारकाच्या ठिकाणी उपस्थित होते.

मोदी पुढे म्हणाले की, भारताच्या संरक्षणासाठी स्वत:च्या जीवाची बाजी लावणार्‍यांना योग्य मान सन्मान दिला गेला नाही, हे दुर्देवी आहे. इतिहास लिहिणार्‍यांनी इतिहासात पालट करून अशा व्यक्तीवर अन्याय केला; मात्र आजचा भारत हा इतिहास पालटत आहे. देशात इतिहास, अध्यात्म, श्रद्धा आणि संस्कृतिक महत्त्व असणार्‍या स्मारकांची उभारणी केली जात आहे.