पणजी ‘स्मार्ट सिटी’मध्ये उगवले गांजाचे रोपटे

अमली पदार्थविरोधी पथकाने रोपटे घेतले कह्यात

प्रतिकात्मक छायाचित्र

पणजी, ४ जानेवारी (वार्ता.) – पणजी शहरातील सांत इनेज परिसरातील एका शॉपिंग मॉलच्या दारातच रस्त्याच्या बाजूला असलेल्या शोभेच्या झाडाच्या रांगेत गांजाचे रोपटे उगवल्याने खळबळ माजली आहे. याविषयी माहिती मिळताच अमली पदार्थविरोधी विभागाच्या पथकाने त्या ठिकाणी धाव घेऊन ते रोपटे कह्यात घेतले.

संबंधित मॉल आणि या गाजांच्या झाडाचा काहीच संबंध नाही. हे रोपटे कुणी रोवले हे कुणालाच ठाऊक नाही; मात्र ‘स्मार्ट सिटी’च्या पाण्यामुळे हे रोपटे वाढून मोठे झाले. ज्या वेळी ही शोभेची झाडे लावण्यात आली, त्या वेळी गांजाच्या रोपाचे बियाणेही त्या ठिकाणी पडले असावे आणि नंतर ते अंकुरले असावे, असा अंदाज वर्तवला जात आहे. त्याचप्रमाणे गांजाचे रोपटे लोकांनी गजबजलेल्या सार्वजनिक ठिकाणी लावण्याची शक्यताही नसल्यामुळे ते गाजांचे रोपटे आहे, अशीही कुणी कल्पना केलेली नसेल; मात्र रोपटे मोठे झाल्यावर त्याला फुटलेल्या पानामुळे ते गांजाचे असल्याचा संशय एकाला आला. संबंधिताने त्याविषयी एका वृत्तवाहिनीच्या पत्रकाराला माहिती दिली. पत्रकाराने त्याविषयी अमली पदार्थविरोधी पथकाला माहिती दिली. अमली पदार्थविरोधी पथकाने घटनास्थळी येऊन पहाणी केली असता ते रोपटे गांजाचेच असल्याचे स्पष्ट झाले.