‘लव्ह जिहाद’चे उदात्तीकरण !

प्रेम करायला विरोध नसतोच; परंतु त्याच्या नावाखाली पसरणारी अनैतिकता, अश्‍लीलता, सामाजिक भान नसणे, पाश्‍चात्त्य (कु)संस्कृतीचा विनाकारण उदो उदो या सार्‍या गोष्टी युवा पिढीसह समाजाला अधोगतीकडे नेणार्‍या निःसंशय आहेत. समवेतच व्यावसायीकरणाची आर्थिक गणिते हा एक मोठा भाग आहेच. या कारणांमुळे राष्ट्रप्रेमी आणि धर्मप्रेमी ‘व्हॅलेंटाईन’ डे साजरा करायला विरोध करतात, हे वेगळे सांगायला नको; परंतु स्वसंस्कृती आणि राष्ट्रपरंपरा यांविषयी काही देणेघेणेच नाही, अशी पुरोगामीत्वाची ढाल मिरवण्यात भूषण वाटणारी काही कथित प्रसिद्ध वृत्तपत्रे आणि प्रसिद्धीमाध्यमे यांना मात्र ‘व्हॅलेंटाईन डे’ आला कि काय करू नि काय नको’ असे होते आणि याच उतावळेपणातून ते किती धोकादायक वृत्ते प्रसारित करून युवकांची आणि समाजाची हानी करत आहेत, याची त्यांना आणि समाजालाही कल्पना येत नाही. ‘व्हॅलेंटाईन डे’च्या निमित्ताने एका वृत्तपत्राने त्याच्या संकेतस्थळावर एक मध्यमवयीन हिंदु महिला आणि मुसलमान पुरुष यांची प्रेमकहाणी झळकवली आणि मुंबई दंगलीतील तणावाच्या पार्श्‍वभूमीवरही हे प्रेम कसे यशस्वी झाले वगैरे सांगितले. ज्यामुळे जनता दंगलीत किती होरपळली आहे, ती दंगल होण्याला कोण कारणीभूत आहे आदी प्रश्‍न पडण्याएवढी प्रगल्भता ना त्या प्रेमीयुगुलामध्ये होती, ना त्यांच्या प्रेमकहाणीचे रसभरीत वर्णन करणार्‍यांमध्ये आहे, असेच यावरून वाटते. हिंदु-मुसलमान लग्न झाल्याची आणि शेवटपर्यंत टिकल्याची कित्येक उदाहरणे इतिहासापासून आताही आहेतच; परंतु याचा अर्थ ‘लव्ह जिहाद’ अस्तित्वात नाही असा नाही. ‘लव्ह जिहाद’मध्ये होरपळलेल्या शेकडो मुली एकट्या मुंबईत अतिशय सहजपणे पुढे येतील. या वृत्तपत्रांचे प्रतिनिधी स्थानिक पोलीस ठाण्यामध्ये गेले आणि शोध घेतला, तरीही अशी प्रकरणे मिळतील. गावोगावी मुसलमानांकडून हिंदु मुली फसवल्या गेल्याची असंख्य उदाहरणे आहेत. कित्येक ध्वनीचित्रफितीत हिंदु मुलींनी स्वतः पुढे येऊन सांगितलेल्या कहाण्या अंगावर शहारे आणणार्‍या आहेत. त्या ध्वनीचित्रफिती या वृत्तपत्र प्रतिनिधींकडे कधी पोचल्या नाहीत आणि या प्रेमाच्या विदारक स्वरूपाचे वर्णन अन्यायाला वाचा फोडणार्‍या कथित वृत्तपत्रांना कधी करावेसे वाटलेले नाही. हा सत्याचा अपलाप नव्हे, तर दुसरे काय ? या वृत्तपत्राच्या पुरवणीतही अशीच एक हिंदु मुलगी आणि मुसलमान मुलाची ‘यशस्वी’ प्रेमकहाणी या प्रेमदिवसाच्या निमित्ताने रंगवून लिहिण्यात आली; इतकेच नव्हे तर शेवटी ‘इथे कुठे ‘लव्ह जिहाद’ आहे ?’ असा संतापजनक प्रश्‍न करण्यात आला. अरे, या प्रकरणात नसेल, म्हणून ‘लव्ह जिहाद’च नाही’, असे सांगण्याचा आटापिटा यातून का केला जात आहे ? याचाच दुसरा अर्थ ‘व्हॅलेंटाईन साजरा करा आणि लव्ह जिहाद वगैरे काही नसल्याने खुशाल मुसलमानांशी प्रेम आणि लग्न करा’, असेच सांगणे, असा आहे.

जगातील आणि देशातील धर्मांधाच्या ‘लव्ह जिहाद’ला बळी पडणार्‍या मुलींचे आकांत या वृत्तपत्रप्रतिनिधींच्या कानात कधी पोचतील, तो सुदिन म्हणावा लागेल. जोपर्यंत स्वतःवर वेळ येत नाही, तोपर्यंत इतरांच्या दुःखाची कल्पना नाही, असे म्हणतात. यामुळे ‘केवळ वैयक्तिक नव्हे, तर व्यापक अर्थाने समाजाची म्हणजेच हिंदूंची हानी होत आहे’, हे पुरोगामित्वाची झापडे लावलेल्यांना लक्षात येईल, अशी अपेक्षा नाही. तूर्तास इतकेच की, ‘लव्ह जिहाद’चे उदात्तीकरण करणार्‍यांचे राष्ट्रप्रेमी आणि धर्मप्रेमी यांनी विरोध करणे, हे त्यांचे कर्तव्य ते करतच रहातील.