‘व्हॅलेंटाईन डे’ला प्रोत्साहन देणार्‍या औषधी आस्थापनाच्या वैद्यकीय प्रतिनिधीचे सनातनचे साधक वैद्य संजय गांधी यांच्याकडून प्रबोधन !

‘व्हॅलेंटाईन डे’च्या निमित्ताने ‘अ‍ॅरिस्टो’ औषधी आस्थापनाकडून केलेले विज्ञापन

मलकापूर (जिल्हा कोल्हापूर), १५ फेब्रुवारी (वार्ता.) – ‘व्हॅलेंटाईन डे’च्या निमित्ताने ‘अ‍ॅरिस्टो’ औषधी आस्थापनाकडून ‘Vital Vitamin for every Valentine’ म्हणजे ‘प्रत्येक प्रेमविरासाठी हे औषध आवश्यकच आहे’, असे विज्ञापन करण्यात आले होते. या आस्थापनाचा वैद्यकीय प्रतिनिधी (एम्.आर्.) त्याची माहिती सांगण्यासाठी सनातन संस्थेचे साधक वैद्य संजय गांधी यांच्याकडे आला होता. या वेळी वैद्य संजय गांधी यांनी त्याला तत्परतेने विरोध करत अशा प्रकारचे विज्ञापन करणे चुकीचे असल्याची जाणीव त्या प्रतिनिधीस करून दिली. यानंतर त्या प्रतिनिधीने ‘अ‍ॅरिस्टो’ या आस्थापनास त्वरित तसे कळवले. ‘या प्रकारचे विज्ञापन इथून पुढे करणार नाही’, अशी ग्वाही त्या वैद्यकीय प्रतिनिधीने वैद्य गांधी यांना दिली.

वैद्य संजय गांधी यांनी त्या प्रतिनिधीचे ‘व्हॅलेंटाईन डे’विषयी अधिक प्रबोधन केल्यावर त्याने ‘ही माहिती माझ्या सर्व मित्रमंडळींना कळवतो’, असे सांगितले.