स्वतःला पालटण्याची तळमळ असणार्‍या आणि कौशल्याने सेवा करणार्‍या ६१ टक्के आध्यात्मिक पातळीच्या सौ. ज्योती दाते !

‘मी गेली ४ वर्षे सेवेनिमित्त पुण्यात आहे. मला अनेक वेळा सौ. ज्योती दाते यांच्या समवेत सेवा करण्याची संधी मिळाली. मी बर्‍याचदा त्यांच्या घरी राहिले आहे. माझा त्यांच्याशी सेवेनिमित्त नियमित संपर्क येतो. मी काही वर्षे सौ. दातेकाकूंचा व्यष्टी साधनेचा आढावा घेत होते. त्या कालावधीत मला सौ. दातेकाकूंची लक्षात आलेली गुणवैशिष्ट्ये येथे दिली आहेत.

सौ. ज्योती दाते

१. स्वयंशिस्त

सौ. दातेकाकूंचे रहाणीमान आणि घर नीटनेटके असते. त्या बाहेर सेवेला गेल्यावरही त्यांच्याकडील वैयक्तिक साहित्य, सेवेचे साहित्य व्यवस्थित ठेवतात. त्या सत्संगातील आणि सेवेविषयीची सूत्रे वहीत व्यवस्थित लिहितात. त्यांच्यातील ‘व्यवस्थितपणा’ हा गुण प्रत्येक ठिकाणी दिसून येतो.

२. प्रेमभाव

अ. काकू त्यांच्या सासू पू. दातेआजींकडून ‘प्रेमभाव’ हा गुण शिकून तो स्वत:त आणत आहेत आणि आता त्यात अधिकाधिक वृद्धी होत असल्याचे जाणवते. काकूंच्या घरी गेल्यावर, त्यांच्याशी भ्रमणभाषवर बोलतांना किंवा त्या भेटल्यावर मला त्यांचे प्रेम अनुभवता येते.

आ. एखादा साधक आजारी असल्याचे काकूंना समजल्यावर काकू त्या साधकाला भ्रमणभाष करतात, भेटायला जातात, काळजी घेण्याविषयी पाठपुरावा करतात. साधकांना त्यांचा आधार वाटतो. त्यांच्या बोलण्यात साधकाविषयी पुष्कळ आस्था असते.

इ. त्या जशी त्यांच्या मुलीची काळजी घेतात, तशी माझीही काळजी घेतात. मी ४ वर्षांपूर्वी प्रथमच पुण्यात आले असतांना माझ्या डोळ्यात लोखंडाचा बारीक कण गेला होता. त्या वेळी मला आधुनिक वैद्यांकडे जावे लागले. माझ्या संदर्भात असा प्रसंग पहिल्यांदाच घडला. तेव्हा माझी आई समवेत नसल्यामुळे मला थोडी भीती वाटत होती. सौ. दातेकाकू माझ्या समवेत चिकित्सालयात आल्या. माझ्या तोंडवळ्यावरून कदाचित् माझी स्थिती काकूंना कळली असावी. त्यांनी मला त्या क्षणी जवळ घेऊन धीर दिला. नंतर मी स्थिर झाले. मी हा प्रसंग कधीच विसरू शकत नाही. मी त्यांचे प्रेम पुष्कळ वेळा अनुभवले आहे.

कु. वैभवी भोवर

३. सेवेतील कौशल्य

त्यांना कोणतीही सेवा दिली, तरी काकू ती सेवा पुष्कळ कौशल्याने करतात. नियोजन करणे, सत्संग घेणे, संगणकीय सेवा, अहवाल पडताळणे, वक्ता म्हणून बोलणे, स्वयंपाक करणे, अशा बर्‍याच सेवा काकू चांगल्या पद्धतीने करतात. त्यांना दिलेल्या सेवेत अधिक लक्ष द्यावे लागत नाही. मला त्यांच्याकडून सेवेतील बरीच सूत्रे आणि बारकावे शिकायला मिळतात.

४. इतरांना साहाय्य करणे

कोणत्याही सेवेत साहाय्य हवे असल्यास दातेकाकूंचे नाव डोळ्यांसमोर येते. त्यांच्याकडे कधी साहाय्य मागितल्यास त्या अवश्य साहाय्य करतात आणि त्यांना अडचण असल्यास पर्याय सुचवतात. त्या नंतर ‘सेवा झाली का ? काही अडचण आली नाही ना ?’, असे विचारतात. एखादी सेवा करतांना त्यात एखादे सूत्र राहिले असल्यास, त्याची आठवण करून देणे, नियोजन चांगले होण्यासाठी सूत्रे सुचवून साहाय्य करणे, असे त्या सहजतेने करतात.

५. संत सहवासाचा साधनेच्या स्तरावर लाभ करून घेणे

पुणे येथे किंवा काकूंच्या घरी संत आल्यावर काकू त्यांचा साधनेच्या स्तरावर लाभ करून घेतात. त्या संतांकडून शिकण्याचा प्रयत्न करतात. त्या संतांना ‘स्वत: कुठे उणे पडते’, हे सांगून ‘काय प्रयत्न करू ?’, असे विचारतात. त्या रामनाथी येथील सनातन आश्रमात गेल्यावर तिथे त्यांना सांगितलेले प्रयत्न त्या चिकाटीने करण्याचा प्रयत्न करतात. ‘त्यांना काय सांगितले’, हे आम्हाला सांगून त्या आम्हाला त्याविषयी साहाय्य करण्यास सांगतात.

६. स्वतःला पालटण्याची तळमळ

काकू व्यष्टी साधनेच्या आढाव्यात प्रांजळपणे प्रसंग सांगायच्या. खरेतर मी वयाने लहान आहे; पण त्यांच्यामध्ये स्वत:ला पालटण्याची तळमळ आणि लाभ करून घेण्याचा भाग एवढा आहे की, वैयक्तिक किंवा सेवेतील कोणतेही प्रसंग सहजतेने सांगून त्या साहाय्य घ्यायच्या. आताही काकूंचा सेवेनिमित्त संपर्क आल्यावर त्या स्वत:विषयी जाणवणारा भाग सांगून साहाय्य घेतात. न्यूनपणा घेऊन साधनेत साहाय्य घेण्याचा भाग मला त्यांच्याकडून शिकायला मिळतो.

७. ‘सौ. ज्योती दाते यांची आध्यात्मिक उन्नती झाली असावी’, असा विचार मनात येणे

सेवा करतांना, तसेच साधनेचे प्रयत्न करतांना सहसाधकांना साहाय्य करणे, त्यांचे साहाय्य घेणे, सूत्रांची चर्चा करतांना साधकांना सामावून घेणे, यांसारख्या लहान-सहान कृतींतून काकूंचे संघभावासाठी प्रयत्न चालू असतात. त्यामुळे ‘त्यांच्यातील प्रेमभाव वाढत आहे’, असे मला जाणवते. ‘गेल्या काही मासांपासून काकूंच्या बोलण्यातून त्यांच्यातील आनंदात वाढ झाली आहे’, असे मला जाणवते. त्यांच्या तोंडवळ्यावर तेज वाढल्याचे जाणवत आहे. त्यांच्या व्यष्टी साधनेच्या आणि भावाच्या प्रयत्नांमध्ये वाढ झाली आहे. गेल्या काही दिवसांपासून ‘काकूंची आध्यात्मिक उन्नती झाली असावी’, असा विचार माझ्या मनात येत आहे.

(‘१७.२.२०२० या दिवशी सौ. ज्योती दाते यांची ६१ टक्के आध्यात्मिक पातळी झाल्याचे घोषित करण्यात आले.’ – संकलक)

‘हे कृपाळू गुरुमाऊली, साधकांना साधनेत पुढे पुढे नेणारे तुम्हीच आहात. मी तुमच्या चरणी कोटीशः कृतज्ञ आहे. ‘साधकांचा सहवास देऊन अखंड शिकण्याची संधी मला तुमच्या कृपेने लाभत आहे. त्याचा लाभ करून घेता येऊ दे’, अशी मी तुमच्या चरणी प्रार्थना करते.’

– देवाला अपेक्षित अशी घडण्यास आतुरलेली, कु. वैभवी भोवर, पुणे. (१४.१.२०२०)