श्री गणेश जयंती आणि चतुर्थीचे प्रकार

१५ फेब्रुवारी २०२१ या दिवशी ‘श्री गणेश जयंती’ आहे. यानिमित्ताने…

इतिहास

श्री गणेशलहरी ज्या दिवशी प्रथम पृथ्वीवर आल्या, म्हणजेच ज्या दिवशी गणेशजन्म झाला, तो दिवस होता माघ शुक्ल पक्ष चतुर्थी. तेव्हापासून गणपतीचा आणि चतुर्थीचा संबंध जोडला गेला. माघ शुक्ल पक्ष चतुर्थी ही ‘श्री गणेश जयंती’ म्हणून साजरी केली जाते. या तिथीचे वैशिष्ट्य म्हणजे या तिथीला श्री गणेशाचे तत्त्व हे नेहमीच्या तुलनेत १ सहस्र पटींनी अधिक कार्यरत असते.

महत्त्व

गणपतीची स्पंदने आणि पृथ्वीच्या चतुर्थी तिथीची स्पंदने सारखी असल्याने ती एकमेकांना अनुकूल असतात; म्हणजेच त्या तिथीला गणपतीची स्पंदने अधिक प्रमाणात पृथ्वीवर येऊ शकतात. प्रत्येक मासातील चतुर्थीला गणेशतत्त्व हे नेहमीच्या तुलनेत पृथ्वीवर १०० पटींनी कार्यरत असते. या तिथीला केलेल्या श्री गणेशाच्या उपासनेने गणेशतत्त्वाचा अधिक लाभ होतो.

चतुर्थीचे प्रकार

शुक्ल पक्षातील चतुर्थीला ‘विनायकी’ आणि कृष्ण पक्षातील चतुर्थीला ‘संकष्टी’ म्हणतात.

अ. विनायकी : या दिवशीच्या पूजाविधीत संकष्टीप्रमाणे चंद्रदर्शन आणि चंद्रपूजा नसते. दिवसभर उपवास करतात आणि दुसर्‍या दिवशी पारणे करतात. या व्रताची देवता ‘श्री सिद्धिविनायक’ असून, सर्व चांगले व्हावे, याकरिता विनायकी करतात.

आ. संकष्टी : संकष्ट म्हणजे संकट ! पृथ्वीपासून येणार्‍या ३६० लहरींनी आपण वेढले जातो. त्यामुळे शरिरातील प्रवाह बंदिस्त होतात. यालाच संकट म्हणतात. कृष्ण पक्षात ३६० लहरी अधिक प्रमाणात कार्यरत असतात. त्यामुळे शरिराच्या नाड्यांतील प्रवाह बंदिस्त होतात. हे संकट निवारण्यासाठी संकष्टी करतात. ३६० लहरींवर श्री गणपतीचे आधिपत्य आहे; म्हणून त्याच्या उपासनेने ३६० लहरींच्या संकटापासून सुटका होते.

या दिवशी दिवसभर उपवास करावा. संपूर्ण निराहार असावे. संध्याकाळी आंघोळ करून श्री गणपतिपूजनाची सिद्धता करून ठेवावी. रात्री चंद्रदर्शनानंतर पूजेसाठी घरात श्री गणेशमूर्ती असल्यास ती आणि नसल्यास अक्षत पुंजावर सुपारी ठेवून तिची ‘श्री गणपति’ म्हणून षोडशोपचारे पूजा करावी. अथर्वशीर्षाची २१ आवर्तने करावी. चंद्राला अर्घ्य द्यावे आणि त्याच्या दिशेने गंध, फूल आणि अक्षता उडवून त्याला नमस्कार करावा. चतुर्थी तिथीला ताम्हनात अर्घ्य द्यावे. शेवटी महानैवेद्य दाखवून भोजन करावे. या व्रताची देवता ‘श्री विघ्नविनायक’ आहे.

इ. अंगारकी : मंगळवारी येणार्‍या चतुर्थीला ‘अंगारकी’ म्हणतात. अंगार म्हणजे मंगळ ग्रह किंवा भूमी. श्री गणपतीचे पृथ्वीप्रमाणे मंगळावरही आधिपत्य आहे. गणपतीचा आणि मंगळाचा रंगही एकच आहे. अंगारकीला गणेशस्पंदने पृथ्वीवर अधिक प्रमाणात येतात, तसेच मंगळाकडून येणारीही गणेशस्पंदने पृथ्वीवर येतात. यामुळे चंद्राकडून येणार्‍या लहरी अधिक प्रमाणात नष्ट होतात; म्हणूनच ‘अंगारकी विनायकी’ आणि ‘अंगारकी संकष्टी’ यांचे फळ वर्षभर केलेल्या अनुक्रमे विनायकी आणि संकष्टी यांच्याइतके आहे.

अंगारकी हे इतर व्रतांप्रमाणे अहोरात्रीचे व्रत नाही. ते पंचप्रहरात्मक व्रत आहे. दिवसाचे चार आणि रात्रीचा एक अशा ५ प्रहरांचे हे व्रत आहे. चंद्रोदयाला भोजन करावे असा विधी आहे; म्हणून ते जेवण म्हणजे पारणे नसून व्रतांगभोजन आहे.

संदर्भ : सनातनचा ग्रंथ ‘श्री गणपति (भाग १)’