हिंसाचारासाठी चिथावणी दिल्यावरून ब्रिटनमधील ‘खालसा टीव्ही’ वाहिनीला ५० लाख रुपयांचा दंड !

ब्रिटनमध्ये चुकीचे आणि समाजविघातक प्रसारण करणार्‍या वाहिन्यांवर कारवाई होते. भारताने यातून बोध घेणे आवश्यक !

लंडन (ब्रिटन) – ब्रिटनमधील शिखांना हिंसाचाराची चिथावणी दिल्याच्या प्रकरणी येथील प्रसारमाध्यमांवर देखरेख ठेवणार्‍या ‘ऑफकॉम’ या संस्थेने येथील ‘खालसा टीव्ही’ या वाहिनीला ५० लाख रुपयांचा दंड ठोठावला आहे.

१. भारतात हिंसाचाराचे समर्थन करणार्‍या एका म्युजिक व्हिडिओचे प्रसारण करणे आणि शीख फुटीरतावाद्यांच्या हिंसक कारवाया सकारात्मक पद्धतीने दाखवल्याच्या प्रकरणी ऑफकॉमने खालसा टीव्हीला दोषी ठरवले आहे.

२. म्युझिक व्हिडिओ ‘बग्गा अ‍ॅण्ड शेरा’मधील गाणे जुलै २०१८ मध्ये खालसा टीव्हीवर प्रसारीत करण्यात आले. या गाण्यात इंदिरा गांधी यांचे छायाचित्र दाखवण्यात येऊन त्यांच्या तोंडातून रक्त येत असल्याचे दाखवण्यात आले होते. इंदिरा गांधी यांच्याविषयी आक्षेपार्ह ओळी या छायाचित्रावर होत्या.

३. याखेरीज लाल किल्ला जळतांना दाखवण्यात आला होता. ३ वेळा हा आक्षेपार्ह व्हिडिओ प्रसारीत केल्यावरून खालसा टीव्हीवर २० लाख रुपयांचा दंड ठोठावण्यात आला.

४. या व्हिडिओतून खलिस्तानी आतंकवाद्यांनी केलेल्या हिंसाचाराचे समर्थन करण्यात आले. यामध्ये ‘ऑपरेशन ब्लू स्टार’मध्ये (खलिस्तानी आतंकवाद नष्ट करण्यासाठी भारतीय सैन्याने राबवलेल्या मोहिमेमध्ये) सहभागी असलेल्यांची हत्या करणार्‍यांचा समावेश आहे. ‘ऑपरेशन ब्लू स्टार’मध्ये सहभागी असणार्‍यांची हत्या खलिस्तानी आतंकवाद्यांनी केली होती.