आतंकवाद्यांचे पंजाब राज्यात गुन्हे आणि नांदेडमध्ये आश्रय घेणे नित्याचेच

नांदेड येथे खलिस्तानी आतंकवाद्याला अटक केल्याचे प्रकरण

सर्वत्र वाढणारा आतंकवाद्यांचा मुक्त संचार वेळीच रोखून ‘आतंकवादमुक्त भारत’ अशी देशाची प्रतिमा निर्माण व्हायला हवी !

नांदेड – शहरात ९ फेब्रुवारी या दिवशी ‘खलिस्तान झिंदाबाद’ या आतंकवादी संघटनेचा आतंकवादी गुरुपिंदर सिंग संतासिंघ बागी सापडला. त्यामुळे नांदेडची खलिस्तानवाद्यांशी असलेली संपर्क यंत्रणा उघडकीस झाली. ‘पंजाब राज्यात गुन्हे करायचे आणि नांदेडमध्ये आश्रय घ्यायचा’, हे आतंकवाद्यांचे नेहमीचेच झाले आहे.

१. पंजाब राज्यातील अमृतसर येथे आतंकवादी कारवायांमधील ४ जणांविरुद्ध तेथे गुन्हा नोंद झाला होता. सरबजितसिंग किरट (रा. भामीपुरा कलन, लुधियाना) हा यातील प्रमुख आरोपी आहे. इतर ३ जणांची नावेही प्रथमदर्शनी अहवालात आली होती.

२. गेल्या २ वर्षांपासून खंडणी, हत्या करणे, गोळीबार या घटनांमध्ये पंजाब आणि नांदेड येथील पोलिसांच्या रडारवर असणार्‍या ‘बब्बर खालसा’ संघटनेतील आरोपीची दहशत येथे कायम आहे; मात्र अद्याप तो पोलिसांच्या हाती लागला नाही.

३. वर्ष १९८८ आणि १९९० च्या काळात पंजाबमध्ये ‘खलिस्तानी आतंकवाद्यां’नी कारवाया केल्या. त्या वेळी पोलिसांनी अनेकांना बेड्या घातल्या, तर अनेकांना ठार केले. याच काळात नांदेड शहरातील वजिराबाद पोलीस ठाण्यात बॉम्बस्फोट करण्यात आला. त्या वेळी मोंढा भागातील उपाहारगृहात खलिस्तानवादी आतंकवाद्याला पकडण्यात आले.

४. त्यानंतर पंजाब पोलिसांना ‘वॉन्टेड’ असणारे गुन्हेगार येथे आश्रयास येणे चालूच आहे. आता त्याच संघटनेचा खलिस्तानी आतंकवादी सापडला आहे. त्यामुळे येथील पोलीस आणखी सतर्क झाले आहेत.

५. पंजाबमध्ये ‘मोस्ट वॉन्टेड’ असणारे अनेक आरोपी आजही शहरात असल्याचे नाकारता येत नाही. त्यामुळे पंजाब पोलीस आणि राज्य आतंकवादीविरोधी पथक (एटीएस्) नेहमी नांदेड पोलिसांच्या संपर्कात रहातात.

सौजन्य : झी २४ तास