… तर धर्माची नव्हे, राष्ट्राचीच फाळणी होईल !

६ फेब्रुवारी २०२१ या दिवशी ‘अखिल भारतीय वीरशैव लिंगायत महासंघा’चा ९ वा वर्धापनदिन आहे. यानिमित्ताने…

गेल्या काही वर्षांपासून लिंगायत हा स्वतंत्र धर्म असल्याची आवई उठवली जात आहे. हे लिंगायतांना हिंदु धर्मापासून तोडण्याचे षड्यंत्र असून यामागे कोण आहे ? त्यांचा हेतू काय आहे ? हे स्पष्ट करणारा ‘तरुण विश्‍व’ संकेतस्थळावर प्रसिद्ध झालेला लेख आमच्या वाचकांसाठी साभार प्रसिद्ध करत आहोत.

भारतियांनी जनगणनेत आपल्या धर्माची नोंद ‘हिंदु’ अशीच करावी !

वर्ष २०२१ मध्ये देशाची जनगणना होत आहे. वर्ष २०२१ मध्ये होणार्‍या जनगणनेत तत्कालीन काँग्रेस सरकारने कार्यवाही केलेल्या सच्चर आयोगाचे परिणाम मोठ्या प्रमाणात दिसून येणार आहेत. त्यामुळे येणार्‍या जनगणनेच्या पार्श्‍वभूमीवर देशातील हिंदूंनी सतर्क राहिले पाहिजे. आपले राष्ट्र लोकशाहीप्रधान असल्यामुळे येथे संख्याबळावर सत्तेचा सारीपाट मांडला जातो, हे लक्षात घेणे आवश्यक आहे. त्यामुळे वेगवेगळ्या जाती-पंथांमध्ये विभागलेल्या भारतियांनी ‘आपण प्रथम हिंदु आहोत’, ‘आपला धर्म हिंदु आहे’, ही एकच गोष्ट लक्षात ठेवून येणार्‍या जनगणनेमध्ये धर्माच्या रकान्यामध्ये आपल्या धर्माची नोंद ‘हिंदु’ अशीच केली पाहिजे. या निमित्ताने ही एकच गोष्ट प्रामुख्याने अधोरखित करायची आहे.

हिंदूंनी संघटित होऊन संख्याबळ टिकवणे अत्यावश्यक !

वर्ष २०१४ मध्ये देशात सत्तापरिवर्तन झाल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काही महत्त्वपूर्ण निर्णय घेऊन देशावर ७० वर्षे अधिराज्य गाजवलेल्या काँग्रेसच्या राजकीय महत्त्वाकांक्षेला सुरूंग लावला. यामुळे या लोकांकडून वेगवेगळ्या क्लृप्त्या वापरण्यात येत आहेत. हिंदु धर्मातील वेगवेगळ्या पंथांच्या नेत्यांना हाताशी धरून समाजात धार्मिक तेढ निर्माण करण्याचे उद्योग गेल्या काही वर्षांपासून चालू आहेत. येनकेन प्रकारेण देशात हिंदूंचे संख्याबळ न्यून करण्याचे हे षड्यंत्र आहे. हिंदू वेगवेगळ्या धर्मांमध्ये विखुरले, तर मुसलमानांचे संख्याबळ आपोआप वाढेल आणि पुन्हा एकदा देशातील मंदिरे अन् मठ यांच्या जागांवर मशिदी उभारल्या जातील. हा धोका लक्षात घेऊन प्रत्येक हिंदु बांधवाने स्वतःची अस्मिता जोपासण्यासाठी भक्कमपणे उभे रहाण्याची आवश्यकता आहे. वीरशैव समाजही त्याला अपवाद नाही.

‘वीरशैव लिंगायत’च्या आचरणपद्धतीतील प्रवाह

गेल्या ७ दशकांपासून देशातील वीरशैव समाज ‘आपला धर्म कोणता आहे ?’, या विवंचनेत जगतो आहे. वास्तविक पहाता वीरशैव लिंगायत, ही आचरणपद्धती अतीप्राचीन अशी आहे; मात्र या परंपरेत दोन प्रवाह आहेत. एक आहे पंचाचार्य परंपरा, जी अतीप्राचीन आणि सनातन मानली जाते. या परंपरेमध्ये ‘५ आचार्यांनी वीरशैव आचारधर्माची स्थापना करून त्याचा प्रचार आणि प्रसार केला’, अशी धारणा आहे, तर दुसरा प्रवाह १२ व्या शतकातील महात्मा बसवेश्‍वर यांचा आहे. महात्मा बसवेश्‍वर यांनी वीरशैव आचारधर्माला चालना दिली. कालबाह्य झालेल्या प्रथांमध्ये काळानुरूप काही पालट करून त्या कार्यवाहीत आणल्या. वीरशैव लिंगायतांचे संस्कृतमध्ये असलेले साहित्य बोलीभाषेत म्हणजे कन्नडमध्ये आणले. त्यालाच ‘वचन साहित्य’ असे म्हटले जाते.

तथाकथित धर्ममार्तंडांनी नवीनच लिंगायत धर्म निर्माण करणे

वीरशैव आचारणपद्धतीतील याच दोन प्रवाहांचे भांडवल करून तथाकथित धर्ममार्तंडांनी आणि त्यांच्या चेल्यांनी नवीनच लिंगायत धर्म निर्माण करून त्यांचे संस्थापक महात्मा बसवेश्‍वर यांना केले. वास्तविक पहाता महात्मा बसवेश्‍वर यांनी जातवेद मुनींकडून दीक्षा घेतल्यानंतर ‘मी शैव होतो, आता वीरशैव झालो’, असे स्पष्ट केलेले असतांना, पंचाचार्य परंपरेचा अस्त करण्याच्या असूयेपोटी समाजबांधवांचा बुद्धीभेद केला आणि वीरशैव अन् लिंगायत हा वाद जन्माला घातला. वर्ष २०११ च्या जनगणनेपर्यंत वीरशैव लिंगायत समाजाच्या बहुतांश लोकांनी धर्माच्या रकान्यामध्ये स्वतःचा धर्म ‘हिंदु’ असल्याची नोंद केलेली आढळते.

वीरशैवांच्या पंचपीठाधीश्‍वरांनी वीरशैव आणि लिंगायत एकच असून ते हिंदु असल्याचे स्पष्ट करणे

वीरशैवांच्या पंचपीठाधीश्‍वरांनी ‘वीरशैव आणि लिंगायत एकच असून ते हिंदु धर्माचा अविभाज्य घटक आहेत’, असे स्पष्ट केले. श्री काशी महास्वामीजी डॉ. चंद्रशेखर शिवाचार्य, श्री केदार महास्वामीजी भीमाशंकरलिंग शिवाचार्य यांनी पत्रकार परिषदा घेऊन आपण ‘हिंदु’ असल्याचे स्पष्ट केले आहे. त्यामुळे समाजातील कोणत्या संघटना काय सांगतात किंवा नेते काय म्हणतात ? याचा समाजबांधवांनी अधिक विचार करण्याची आवश्यकता नाही.

महाराष्ट्र सरकारने वर्ष २०११ मध्ये लिंगायत समाजाची ‘हिंदु’ म्हणूनच नोंद करणे

केंद्र सरकारच्या अल्पसंख्यांक मंत्रालयाने अल्पसंख्यांक आयोगाचा अहवाल राज्य सरकारला पाठवला आहे. त्यात ‘लिंगायत हा स्वतंत्र धर्म नसून हिंदु धर्माचा एक पंथ आहे’, असे स्पष्ट केले आहे. त्याच आधारावर महाराष्ट्र सरकारने वर्ष २०११ च्या जनगणनेत लिंगायत समाजाची स्वतंत्र नोंद घेण्यात आली नसल्याचे स्पष्ट केले आणि ‘भारतीय राज्यघटनेत नवीन धर्म जन्माला घालण्याची किंवा धर्माच्या अंतरंगात हस्तक्षेप करण्याची तरतूद मुळीच नाही’, असा निर्वाळा दिला.

हिंदूंमध्ये फूट पाडणे, हे साम्यवाद्यांचे षड्यंत्र !

वर्ष २०१४ नंतर देशात भाजपची सत्ता आल्यानंतर पंतप्रधान नरेद्र मोदी यांनी काश्मीरमधील कलम ३७० हटवले, अयोध्येतील श्रीरामजन्मभूमी मुक्त केली आणि आता देशात समान नागरी कायदा आणण्याचा विचार करत आहे. देशात समान नागरी कायदा अस्तित्वात आला, तर जगणे कठीण होईल, याची भीती विरोधकांसह अल्पसंख्याकांना वाटते; म्हणून धर्माच्या आडून राजकारण करण्याचा विरोधकांचा आणि साम्यवाद्यांचा हेतू आहे. हा हेतू साध्य करायचा असेल, तर हिंदूंचे संख्याबळ न्यून करणे, हाच एक पर्याय शेष रहातो. यापूर्वीच वर्ष १९६७ मध्ये शीख समाज हिंदूंपासून वेगळा झाला, वर्ष १९९० पासून सातत्याने प्रयत्न करून जैन समाजालाही हिंदूंपासून तोडण्यात आले. आता जाट, मराठा, गुज्जर, लिंगायत, पाटीदार असे मोठ्या संख्येने असलेला समाज हिंदु धर्मापासून वेगळा करण्यासाठी फुटीर गटांना शक्ती देत त्यांना देशविरोधी कार्यात ओढले जात आहे. येनकेन प्रकारेण हिंदूंची लोकसंख्या ५० टक्क्यांच्या खाली आणायची आणि मग ‘गजवा-ए-हिंद’ची कार्यवाही करण्यासाठी मार्ग प्रशस्त करायचा, हाच एकमेव कार्यक्रम यामागे आहे, हे लक्षात घेतले पाहिजे. हा कार्यक्रम साध्य करण्यासाठी वर्ष २०२१ आणि त्यानंतर होणार्‍या जनगणनेचा वापर करायचा, तसेच हिंदु धर्माचे तुकडे करून त्यातील वेगवेगळे पंथ, संप्रदाय वेगळे करायचे, असे साम्यवाद्यांनी पद्धतशीरपणे रचलेले षड्यंत्र आहे.

प्रत्येकाने वीरशैव आणि लिंगायत एकच असून ते हिंदु धर्माचा अविभाज्य घटक असल्याचा प्रचार करावा !

वीरशैव आणि लिंगायत हे एकच असून ‘हिंदु धर्माचा अविभाज्य घटक’ असल्याचा निर्वाळा श्रद्धेय पंचपीठाधीश्‍वरांनी दिला आहे. त्यामुळे आता समाजातील प्रत्येक घटकाने, धर्मगुरूंनी आपल्या शिष्यांना, समाजातील नेत्यांनी स्वतःचे कार्यकर्ते-समर्थक यांना, तसेच आपण जेथे आहोत, तेथे आपल्या संपर्कात येणार्‍या प्रत्येक समाजबांधवाला येत्या जनगणनेत धर्माच्या रकान्यामध्ये ‘हिंदु’ लिहिण्यासाठी प्रेरित करत राहिले पाहिजे. समाजातील कोणत्या संघटनेची काय भूमिका आहे ? याचा कुठलाही विचार न करता आपण स्वत:च स्वतःच्या धर्माचे प्रचारक व्हावे. हेच एक प्रभावी माध्यम ठरू शकेल. अन्यथा साम्यवाद्यांनी वीरशैव आणि लिंगायत अशी होऊ घातलेली फाळणी आकार घेईल आणि पर्यायाने आपण स्वत:हून राष्ट्राच्या दुसर्‍या फाळणीकडे वाटचाल केल्याचे पातक आपल्या मस्तकी मारले जाईल. याखेरीज आपलीच पुढची पिढी आपल्याला राष्ट्रीय गुन्हेगार ठरवेल. त्यामुळे वेळीच जागे व्हा आणि आपल्या शेजार्‍यालाही जागे करा. येत्या जनगणनेत धर्माच्या रकान्यात आपला धर्म ‘हिंदु’ लिहा !

– श्री. परमेश्‍वर लांडगे, उपाध्यक्ष, अखिल भारतीय वीरशैव लिंगायत महासंघ

धर्मनोंदीसंबंधी अखिल भारतीय वीरशैव लिंगायत महासंघाचे स्तुत्य प्रयत्न !

अखिल भारतीय वीरशैव लिंगायत महासंघानेही धर्माच्या नोंदीसंदर्भात आपली भूूमिका स्पष्ट करत धर्माच्या रकान्यामध्ये ‘हिंदु’ अशीच नोंद करण्याचे आवाहन केले आहे. महासंघाचे कार्याध्यक्ष डॉ. विजय जंगम यांनी स्पष्ट केले की, महासंघाच्या वतीने जनगणनेत धर्माची नोंद करण्यासंदर्भात राज्यभरात जेथे जेथे शक्य असेल, तेथे महासंघाच्या कार्यकर्त्यांनी प्रत्येक घरोघरी जाऊन समाजबांधवांना जागृत करण्याची योजना आहे. यासाठी महासंघाने पूर्ण सिद्धता केली असून महाराष्ट्रासह राजस्थान आणि मध्यप्रदेश येथे कामाला आरंभ करण्यात आलेला आहे. वर्ष २०२१ ची जनगणना चालू होण्यापूर्वी हे अभियान अंतिम टप्प्यात आलेले असेल. महासंघाची ही तत्परता लक्षात घेता, महासंघाचे कर्तेकरविते अभिनंदनास पात्र ठरतात, तद्वतच ‘समाजबांधवांनी अतिशय गांभीर्याने अशा उपक्रमांचे स्वागत करावे’, अशी अपेक्षा आहे.

तसे पहाता अखिल भारतीय वीरशैव लिंगायत महासंघाची स्थापनेपासूनच ही भूमिका राहिलेली आहे. यासाठी महासंघाने महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांमध्ये जमतील तसे कार्यक्रम घेऊन समाजजागृती केल्याचे दिसून येते. तसेच धर्ममान्यतेच्या मागणीला प्रखरतेने विरोध करण्यात महासंघ अग्रस्थानी असल्याचेही प्रकर्षाने जाणवते. यासाठी अनेक वेळा पत्रकार परिषद घेऊन आणि सरकारकडेही वेळोवेळी त्यांनी पाठपुरावा केलेला आहे.