परशुराम, अर्जुन, छत्रपती शिवाजी महाराज यांच्याप्रमाणे ब्राह्मतेज आणि क्षात्रतेज निर्माण करा ! – हर्षद खानविलकर

प्रजासत्ताक दिनानिमित्त मराठवाडा आणि विदर्भ येथे ‘ऑनलाईन’ शौर्यजागृती वर्गाचे आयोजन !

श्री. हर्षद खानविलकर

जालना – आता आपल्यालाच राष्ट्राभिमान जागवण्याची आवश्यकता आहे. २६ जानेवारीनिमित्त शौर्यजागृती करण्याची आवश्यकता आहे. शारीरिक, मानसिक यांसह आपल्याला बौद्धिक आणि आध्यात्मिक बळही वाढवायचे आहे, ज्याप्रमाणे परशुराम, अर्जुन, छत्रपती शिवाजी महाराज यांच्यात ब्राह्मतेज आणि क्षात्रतेज होते, तेच आपल्याला स्वतःत निर्माण करायचे आहे, असे प्रतिपादन  हिंदु जनजागृती समितीचे युवा संघटक श्री. हर्षद खानविलकर यांनी केले. नुकत्याच झालेल्या प्रजासत्ताकदिनानिमित्त ‘गाथा शौर्याची’ या ‘ऑनलाईन’ प्रणालीच्या माध्यमातून २६ जानेवारी या दिवशी मराठवाडा, विदर्भ प्रांत शिबिर घेण्यात आले. या शिबिराला पुष्कळ धर्मप्रेमींचा चांगला प्रतिसाद लाभला.

या व्याख्यानात संपूर्ण ‘वन्दे मातरम्’च्या प्रत्येक कडव्याचा अर्थ श्री. हर्षद खानविलकर यांनी सांगितला. नंतर सर्व धर्मप्रेमींनी आपापल्या ठिकाणी उभे राहून संपूर्ण ‘वन्दे मातरम्’ म्हटले. धर्मप्रेमींनी ‘चॅट बॉक्स’च्या माध्यमातून उत्स्फूर्त प्रतिसाद आणि घोषणाही दिल्या.

मनोगत

 श्री. योगेश माळी – व्याख्यानात पुष्कळ चांगले शिकायला मिळाले. पूर्वजांच्या बलीदानाचा आपण सर्वांनीच विचार करायला हवा.

 हेमाताई दिवाकर – प्रत्येक देशात धर्म आहे. धर्मात तत्त्व सांगितले आहे. आपण त्याचे पालन केल्यासच शक्ती मिळेल. धर्माचरण नसल्याने सर्वत्र भ्रष्टाचार होत आहे. त्यामुळे तरुण आत्मबल गमावून बसले आहेत. ‘फूल नाही; पण फुलाची पाकळी म्हणून तरी हिंदु राष्ट्रासाठी तरी सहभाग घेऊया’, असे वाटते.