शरजील उस्मानी याच्यावर राष्ट्रद्रोहाचा गुन्हा नोंद करा आणि आणि एल्गार परिषदेवर कायमची बंदी घाला ! – नितीन चौगुले, श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान

श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानच्या वतीने शरजील उस्मानी याच्या प्रतिकात्मक पुतळ्याला जोडे मारा आंदोलन !

एल्गार परिषदेत हिंदुविरोधी आणि राष्ट्रविरोधी गरळओक केली जाते. असे असतांनाही त्यावर बंदी घालण्याची मागणी करावी लागते, हे प्रशासकीय यंत्रणांसाठी लज्जास्पद !

शरजील उस्मानी याच्या प्रतिकात्मक पुतळ्याला जोडे मारतांना नितीन चौगुले आणि अन्य धारकरी

सांगली, ४ फेब्रुवारी (वार्ता.) – यापूर्वी एल्गार परिषदेमुळेच दंगल घडनूही यंदा त्याला अनुमती देण्यात आली. प्रथम अनुमती नाकारून नंतर अचानक ३० जानेवारीला अनुमती देण्यामागचे गौडबंगाल काय ? हिंदु समाज सडका नसून तो अत्यंत उदात्त मनोवृत्तीचा आहे. हिंदु समाजाने कधीही कुणावर आक्रमण केलेले नाही. असे असतांना जाणीवपूर्वक हिंदु समाजावर वृथा आरोप करणार्‍या शरजील उस्मानी याच्यावर राष्ट्रद्रोहाचा गुन्हा नोंद करावा आणि एल्गार परिषदेवर कायमची बंदी घालावी, अशी मागणी श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे कार्यवाह श्री. नितीन चौगुले यांनी केली. सांगलीत ४ फेब्रुवारी या दिवशी श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानच्या वतीने शरजील उस्मानी याच्या प्रतिकात्मक पुतळ्याला ‘जोडे मारा’ आंदोलन करण्यात आले. त्या वेळी ते बोलत होते.

श्री. नितीन चौगुले म्हणाले, ‘‘ज्या वेळी भाग्यनगर येथे एका आधुनिक वैद्य असणार्‍या तरुणीवर सामूहिक बलात्कार करून ठार मारण्यात आले, त्या वेळी त्या विरोधात कुणी काहीच बोलले नाही. गोरक्षक प्रशांत पुजारी यांची हत्या ही ‘मॉब लिंचिंग’च होती. त्यावर कुणीही आवाज उठवला नाही. देहलीतील दंगलीत अंकित शर्मा यांची हत्या झाल्यावर कुणी पुरस्कार परत केले नाहीत. याउलट एखादी घटना झाल्यावर त्याचे भांडवल करून समाजात तेढ निर्माण करण्याचे काम मात्र शरजीलसारखे करतात. या प्रकरणी आयोजकांवरही गुन्हे नोंद होणे आवश्यक आहे. आज आम्ही प्रतिकात्मक आंदोलन करत आहोत; भविष्यात प्रत्यक्षात शरजीलला जोडे मारण्याचे आंदोलन करू.’’

याप्रसंगी धारकरी सर्वश्री आनंदराव चव्हाण, प्रदीप पाटील, प्रकाश निकम, सचिन मोहिते, प्रशांत गायकवाड, सतीश खांबे, अशोक शेट्टी, विशाल चव्हाण, भूषण गुरव, सचिन देसाई, पैलवान सचिन पाटील, पैलवान मोहन शिंदे यांसह अन्य कार्यकर्ते उपस्थित होते.