सांगोला, सोलापूर येथील कु. दीप पाटणे (वय १९ वर्षे) याने पूर्णवेळ साधना करण्याचा निर्णय घेतल्यानंतर त्याला जाणवलेली सूत्रे आणि आलेल्या अनुभूती
१. पूर्णवेळ साधना करण्याचा निर्णय घेतल्यानंतर मनातील मायेचे विचार न्यून होणे
‘मी देवाला शरण जाऊन प्रार्थना केल्यावर देवाने मला शक्ती आणि बळ दिले. त्यामुळे मी पूर्णवेळ साधना करण्याचा निर्णय घेऊन स्थिर राहू शकलो. गुरुदेवांच्या कृपेमुळे मी पूर्णवेळ साधना करण्याचा निर्णय घेतल्यानंतर माझ्या मनातील मायेचे आणि मनोराज्यात रमण्याचे विचार न्यून झाले.
२. रामनाथी आश्रमात मन सतत अंतर्मुख राहून नामजप आपोआप चालू होणे आणि नवीन सेवा शिकण्याचा उत्साह वाढणे
मी रामनाथी आश्रमात आल्यापासून सतत अंतर्मुख असतो. मी सेवा करतांना माझा नामजप आपोआप चालू होतो. माझे मन अस्थिर झाले किंवा माझे इकडे-तिकडे लक्ष गेले आणि नंतर स्थिर झाल्यावर मी अंतर्मनात डोकावले, तर लक्षात येते की, माझा नामजप चालू आहे. माझा नामजप मनात चालू असल्यामुळे माझा नवीन सेवा शिकण्याचा उत्साह वाढतो.
३. देवाला ‘ही सेवा कशी करू?’, असे विचारल्यावर परिपूर्ण सेवा होण्यासाठी देवाचे पुष्कळ साहाय्य मिळणे
मी देवाला ‘सेवा करतो’, असे सांगण्याऐवजी ‘मी ही सेवा कशी करू ?’, असे देवाला विचारल्यावर मला त्याचे पुष्कळ साहाय्य मिळते. सेवा परिपूर्ण होण्यासाठी परात्पर गुरुदेव साधक किंवा विचार यांच्या माध्यमातून मला साहाय्य करतात. मला अशी अनुभूती पुष्कळ वेळा आली आहे.
४. चांगल्या, तसेच वाईट प्रसंगातही गुरूंप्रती कृतज्ञता व्यक्त होणे
पूर्वी माझ्या जीवनात काही चांगल्या गोष्टी घडल्यावर माझी गुरूंप्रती कृतज्ञता व्यक्त होत होती. आता मला काही अडचणी आल्या किंवा माझ्या जीवनात वाईट प्रसंग घडले, तरी माझ्याकडून कृतज्ञता व्यक्त होते; कारण त्या प्रसंगातूनही परात्पर गुरुदेव मला अनमोल शिकवण देतात.
५. बाहेरच्या जगात तीव्र आपत्कालीन स्थिती आहे; परंतु वैकुंठरूपी रामनाथी आश्रमात आपत्काळाची किंचितही झळ लागत नाही. मी आश्रमात आल्यापासून माझे मन सतत आनंदी असते.’
– कु. दीप पाटणे (वय १९ वर्षे), सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (१९.१०.२०२०)
कु. दीप पाटणे यांनी युवा साधकांच्या व्यष्टी साधनेच्या आढाव्यात घेतलेली भावार्चना !
१. आपत्कालीन परिस्थितीमुळे दळणवळणाच्या सर्व सोयी बंद होणे, साधकांनी परात्पर गुरुदेवांना आळवून ‘आता आम्ही रामनाथी आश्रमात कसे येऊ ?’, असे विचारणे आणि तेव्हा परात्पर गुरुदेवांनी सर्वांसाठी पुष्पक विमान पाठवणे
‘आपत्काळाची भयानकता वाढत आहे. त्यामुळे सर्व साधकांना रामनाथी आश्रमात बोलावले आहे. आपण रामनाथी आश्रमात जाण्यासाठी सोलापूर येथे एकत्रित आलो आहोत. तेथेच राहून आपण थोडे दिवस व्यष्टी आणि समष्टी साधना करत आहोत. त्यानंतर आपल्याला समजले, ‘आपत्कालीन परिस्थितीमुळे दळणवळणाच्या सर्व सोयी बंद झाल्या आहेत.’ आपण सर्व साधक परात्पर गुरु डॉ. आठवले यांना आळवून म्हणत आहोत, ‘हे गुरुमाऊली, आता आम्ही रामनाथी आश्रमात कसे येऊ ?’ त्याच वेळी परात्पर गुरुदेवांनी आपल्या सर्वांसाठी पुष्पक विमान पाठवले आहे. त्यामुळे आपल्याला पुष्कळ कृतज्ञता वाटत आहे.
२. पुष्पक विमान विशिष्ट उंचीवर गेल्यावर साधकांना भयानक अशा आपत्काळाची जाणीव होणे आणि त्या वेळी मनाला स्थिर करण्यासाठी सर्व साधक संघभावाने ‘ॐ नमो भगवते वासुदेवाय ।’ हा नामजप मोठ्याने म्हणू लागणे
आपण पुष्पक विमानात बसून रामनाथी आश्रमाकडे निघालो आहोत. एक विशिष्ट उंचीवर गेल्यावर आपल्याला भयानक अशा आपत्काळाची जाणीव होत आहे. पुढे पुढे जात असतांना आपल्याला कुठे आग, कुठे पूर, तर कुठे युद्धजन्य परिस्थिती निर्माण झालेली दिसत आहे. ही सर्व स्थिती पाहून आपल्या सर्वांची स्थिती अस्थिर होत आहे. त्याच वेळी आपण सर्वांनी संघभावाने ‘ॐ नमो भगवते वासुदेवाय ।’ हा नामजप मोठ्याने चालू केला आहे.
हा भयावह आपत्काळ पाहून काही साधकांची स्थिती पुष्कळ अस्थिर होऊन ते बेशुद्ध पडत आहेत. त्याच वेळी प्रथमोपचार शिकलेले साधक त्या साधकांना शुद्धीवर आणून त्यांची काळजी घेत आहेत आणि प्रशिक्षण शिकलेले साधक घोषणांद्वारे क्षात्रवृत्ती निर्माण करून साधकांना सक्षम अन् स्थिर रहाण्यासाठी सिद्ध करत आहेत.
३. पुष्पक विमान काही वेळानंतर रामनाथी आश्रमाच्या समोर येणे आणि सर्व साधक सुखरूप गुरुचरणी स्थिरावणे
आपण जसजसे रामनाथी आश्रमाच्या जवळ येत आहोत, तसतसा अंधकार न्यून होऊन पिवळ्या प्रकाशाचे प्रमाण वाढत आहे. आपले पुष्पक विमान काही वेळानंतर रामनाथी आश्रमाच्या समोर स्थिरावले आहे. आपण पुष्पक विमानाच्या बाहेर येताच आपल्याला दिसत आहे, ‘साक्षात् परात्पर गुरुदेव त्यांच्या खोलीच्या बाहेर आधीच येऊन आपली वाट पहात आहेत.’ आपण अशा भयानक आपत्काळातून सुखरूप गुरुचरणी स्थिरावलो आहोत.
४. परात्पर गुरुदेवांच्या विष्णुस्वरूप विराट रूपावर स्वर्गातून सर्व देवीदेवता फुलांचा वर्षाव करतांना दिसणे
काही वेळानंतर वर पहाताच आपल्याला परात्पर गुरुदेवांचे विष्णुस्वरूप रूप विराट होतांना दिसत आहे. परात्पर गुरुदेवांच्या विराट रूपावर स्वर्गातून सर्व देवीदेवता सुंदर आणि मोहक अशा फुलांचा वर्षाव करत आहेत. आपण असेच गुरुचरणी लीन होऊन अखंड कृतज्ञताभावात राहूया.’
– कु. दीप संतोष पाटणे (वय १९ वर्षे), सांगोला, सोलापूर. (२५.९.२०२०)
येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |