अण्णा हजारे यांनी काय करावे आणि ते कसे आहेत, हे देशाची सर्वाधिक हानी करून देशाला रसातळाला नेणार्या काँग्रेसच्या नेत्यांनी सांगण्याची आवश्यकता नाही. अण्णा हजारे यांनी काय करावे आणि काय करू नये, याचे स्वातंत्र्य त्यांना नाही का ? त्यांनी उपोषण रहित केले, तर काँग्रेसच्या नेत्यांना पोटशूळ का उठला आहे ?
पुणे – अण्णा हजारे हे महाराष्ट्रातील हास्यास्पद व्यक्तिमत्व आहे. अण्णा म्हणजे महात्मा गांधी नव्हेत. अण्णा हे अविश्वासू प्रकारचे व्यक्तीमत्व असून ते ‘मॅनेज’ होतात, असा गंभीर आरोपही काँग्रेसचे नेते आणि माजी खासदार डॉ. भालचंद्र मुणगेकर यांनी पुण्यातील पत्रकार परिषदेत केला. या वेळी त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रातील सरकार यांवरही टीका केली.
शेतकर्यांच्या प्रश्नांवर उच्चाधिकार समिती नियुक्त करण्याचे लेखी आश्वासन घेऊन ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी त्यांचे उपोषण स्थगित केले आहे. आपल्या पूर्वी केलेल्या आणि अजूनही प्रलंबित असलेल्या मागण्यांसाठी हजारे यांनी ३० जानेवारीपासून राळेगणसिद्धी येथे उपोषणाची चेतावणी दिली होती; मात्र त्याच्या एक दिवस आधीच केंद्रीय कृषी राज्यमंत्र्यांच्या उपस्थितीत आणि विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांच्या मध्यस्थीमुळे तोडगा निघाला. त्यामुळे हे उपोषण अण्णांनी स्थगित करण्याचा निर्णय घेतला. त्यावर मुणगेकर यांनी टीका करत वरील विधान केले आहे.