मुंबई – मुंबई-पुणे एक्स्प्रेस मार्गावर गाडीतून बंदुकीचा धाक दाखवून गाड्यांना ओव्हरटेक करणारे तरुण शिवसैनिक नसल्याचे स्पष्टीकरण गृहराज्यमंत्री शंभुराजे देसाई यांनी दिले आहे.
वाहतूककोंडीतून सुटका करून घेण्यासाठी एक गाडीचालक आणि त्याचा सहकारी इतर वाहनचालकांना बंदुकीचा धाक दाखवत असल्याचा प्रकार मुंबई-पुणे एक्स्प्रेस महामार्गावर घडला होता. याची ध्वनीचित्रफीत समाज माध्यमावर प्रसारित झाली होती. संबंधित गाडीवर शिवसेनेचे चिन्ह असल्याने उलटसुलट चर्चेला उधाण आले होते.
एम्.आय.एम्.चे खासदार इम्तियाज जलील यांनी त्यांच्या टि्वटर खात्यावरून हा घडलेला प्रकार दाखवणारी ध्वनीचित्रफीत प्रसारित केली होती. त्यात त्यांनी म्हटले होते, ‘शिवसैनिक त्यांच्या गाडीसाठी वाट काढत असतांना रिव्हॉल्व्हरचे ब्रँडिंग करीत होता. राज्याचे गृहमंत्री आणि पोलीस महासंचालक याची नोंद घेतील का ?’ अनेक टि्वटरकरांनी ही ध्वनीचित्रफीत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, गृहमंत्री अनिल देशमुख यांना टॅग करून रीट्वीटही केली होती. ‘ही सत्तेची गुर्मी आहे’, असा आरोप काही जणांनी केला होता.