राज्यात तिसर्‍या जिल्ह्याच्या निर्मितीची मागणी करणारा ठराव २३ विरुद्ध ८ मतांनी फेटाळण्यात आला

पणजी, २९ जानेवारी (वार्ता.) – फोंड्याचे आमदार रवि नाईक यांनी सत्तरी, फोंडा आणि धारबांदोडा तालुक्यांचा मिळून राज्यात तिसरा जिल्हा निर्माण करण्याचा खासगी ठराव विधानसभेत मांडला होता. हा ठराव अखेर २३ विरुद्ध ८ मतांनी विधानसभेने फेटाळला.

याविषयी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत म्हणाले, ‘‘तिसरा जिल्हा निर्माण करण्याचा विचार भविष्यात करू; मात्र सध्या तसा विचार करता येणार नाही. लोकसंख्या आणि मतदार यांचा राष्ट्रीय निकष पहाता हे शक्य होणार नाही.’’

आमदार रवि नाईक ठराव मांडतांना म्हणाले, ‘‘प्रशासन जनतेच्या घरापर्यंत पोचण्यासाठी राज्यात तिसर्‍या जिल्ह्याची निर्मिती आवश्यक आहे. सत्तरी, फोंडा आणि धारबांदोडा तालुक्यांत अनुसूचित जाती-जमाती आणि इतर मागासवर्गीय यांचे प्रमाण अधिक आहे. तिसरा जिल्हा निर्माण केल्यास केंद्रीय योजनांचा त्यांना अधिक लाभ मिळू शकेल.’’

महसूलमंत्री जेनिफर मोन्सेरात म्हणाल्या, ‘‘सध्याची प्रशासकीय व्यवस्था उत्तम आहे. ऑनलाईन पद्धतीने कामे होत असल्याने जनतेला सरकारी कार्यालयात कामे होण्यास कोणतीही अडचण येत नाही. उपजिल्हाधिकारी कार्यालय राज्याच्या प्रत्येक तालुक्यात उपलब्ध आहे.’’ आमदार रवि नाईक यांनी मांडलेला ठराव मागे घेण्यास नकार दिल्याने ठरावावर विधानसभेत मतदान घेण्यात आले. या वेळी बहुमताने हा ठराव फेटाळण्यात आला.