पर्ये येथील साठी-सत्तरीची देवी श्री भूमिकादेवीचा आज जत्रोत्सव !

सांखळीहून ३ कि.मी. अंतरावर वसलेले सत्तरी तालुक्यातील पर्ये गाव हे निसर्गसंपन्न आणि अनेक देवतांच्या मंदिरांनी वसलेले गाव. या गावात असलेले मुख्य मंदिर म्हणजे श्री भूमिकादेवीचे मंदिर ! लोक तिला श्री सप्तशतीदेवी असेही म्हणतात. केवळ पर्ये नव्हे, तर संपूर्ण सत्तरी तालुका आणि सांखळी ग्राम यांना आपल्या कृपाछत्राखाली घेतलेल्या श्री भूमिकादेवीचा वार्षिक कालोत्सव (जत्रोत्सव) पौष कृष्ण पक्ष द्वितीया (३०.१.२०२१) या दिवशी साजरा होत आहे. यानिमित्त देवीचे माहात्म्य सांगणारा हा लेख !

संकलक : श्री. श्रीपाद बाकरे, सांखळी, गोवा.

साठी-सत्तरीची देवी

श्री भूमिकादेवीचे मंदिर आणि प्रवेशद्वार

श्री भूमिकादेवीच्या मंदिरात श्रीदेवी भूमिकेसह सत्तरी तालुक्यात जेवढ्या देवता आहेत, तेवढ्या देवतांच्या पाषाणी मूर्ती मंदिराच्या गर्भकुडीत आहेत. श्री माऊलीदेवी, श्री सातेरीदेवी, श्री महालसादेवी, श्री ब्राह्मणीदेवी, श्री जोगेश्‍वरी, श्री केळबायदेवी, श्री पासणकरीण इत्यादी सर्व सत्तरीवासियांचे मूळ स्थान पर्ये येथे आहे. पूर्वी सत्तरीमध्ये कोणत्याही गावी एखादे संकट आले (वैयक्तिक किंवा सामूहिक), रोगराई चालू झाली, दुष्काळ पडला किंवा परकियांचे आक्रमण झाले, तर सर्व लोक श्री देवी भूमिकादेवीकडे धाव घेत असत. तिला सांगणे घालत, धार्मिक विधी करत. हाकेला धावून येणारी ही देवता असल्याने आजही सत्तरीवासीय या मंदिरात येतात. देवीला नवस बोलतात, तिचा कौल घेतात. सर्व सत्तरीवासियांची श्रद्धा श्री भूमिकादेवीवर आहे आणि त्यामुळे आजही पर्ये गावातील लोक सत्तरी तालुक्यात कुठेही गेले की, त्यांचा आदरसन्मान केला जातो.

मंदिरातील सुंदर आणि सुशोभित १२ कलश !

मंदिराच्या गर्भकुडीत देवतांच्या पाषाणी मूर्तीसमवेतच १२ कलश आहेत. हे कलश देवतांची पूजा नियमित अन् भावपूर्ण करणारे पर्येचे माजीक प्रतिदिन स्वच्छ आणि सुशोभित ठेवतात. त्यात नियमित तीर्थरूपी पाणी भरून त्यांची पूजा केली जाते. देवळात येणार्‍या प्रत्येक भाविकाचे लक्ष वेधून त्यांच्यामध्ये भक्तीभाव निर्माण करणारे हे देवतांचे कलश आहेत. पर्ये गावापासून ३० कि.मी. अंतरावर कर्नाटक राज्यातील कणकुंबी गाव आहे. या गावात श्री माऊलीदेवीच्या मंदिरासमोरील तळ्यात १२ वर्षांनी तीर्थ (पाणी) भरून वहाते. त्या वेळी श्री भूमिकादेवीच्या मंदिरातील कलश पाण्याने भरून वहातो. याची अनुभूती गेली सहस्रो वर्षे भाविक घेत आहेत.

श्री भूमिकादेवीचा कळस एक रात्रसुद्धा मंदिराबाहेर वास्तव्यास (निवास) नसणे !

गोव्यात अनेक ठिकाणी देवतांचा कळस पूर्ण गावात किंवा गावाबाहेर जाऊन भाविकांना कौल देतो, आशीर्वाद देतो. काही ठिकाणी ५ दिवस किंवा ७ दिवस हा कळस गावात फिरतो आणि रात्री एखाद्या घरी मुक्कामाला असतो; मात्र श्री भूमिकादेवीचा कळस गुढीपाडव्याच्या दिवशी सांखळी येथे जातो; परंतु रात्री पुन्हा मंदिरात येतो. मायभूमिका आपल्या भक्तगणांसाठी मंदिरात सदैव वास्तव्य करते, ती २४ घंटे भक्तांसाठी कार्यरत आहे, अशी सत्तरीवासियांची श्रद्धा आहे. गोव्यात काही ठिकाणी देवतांची मंदिरे ५ दिवस किंवा १२ दिवस बंद ठेवली जातात. काही ठिकाणी सकाळच्या वेळीच देऊळ उघडे असते. श्री भूमिकादेवीचे मंदिर भक्तांसाठी दिवसभर उघडेच असतेे.

सर्व वाटसरूंची देवता !

रस्त्याने येणारे-जाणारे, वाहने, बैलगाडीवाले आपल्या गाड्या देवीच्या मंदिराकडे थांबवून देवीचे दर्शन आणि आशीर्वाद घेऊनच पुढे प्रवासाला जातात. देवीच्या आशीर्वादाने प्रवास सुखरूप झाल्याची आणि अपघात टळल्याची अनुभूती अनेकांनी घेतली आहे. त्यामुळे पूर्वीपासून सर्व वाटसरू आणि बैलगाडीवाले कृतज्ञतेचा भाग म्हणून वर्षातून एकदा आपल्या गाड्या देवीच्या मंदिरासमोर आणून ठेवत, दिवसभर धार्मिक विधी करत. आजही ही परंपरा चालू आहे. आता बैलगाड्या नाहीत, तर सर्व बसचालक, मालक आणि वाहतूकवाले वर्षातून एकदा देवीचा उत्सव साजरा करतात. गावातील कोणाच्या घरी असलेली बैलगाडी (जुनी) आणून मंदिरासमोर ठेवतात आणि देवीला सांगणे (गार्‍हाणे) तसेच सामूहिक प्रार्थना करतात.

मंदिरात होणारे इतर उत्सव

१. गुढीपाडवा : गुढीपाडव्याच्या दिवशी संपूर्ण दिवस धार्मिक कृत्ये पार पाडली जातात आणि दुसर्‍या दिवशी संवत्सर फल वाचन केले जाते.

२. विजयरथ मिरवणूक : चैत्र शुक्ल पक्ष पौर्णिमा

३. श्रावणीमाहात्म्य : श्रावणातील सोमवार, गुरुवार आणि शुक्रवार हे दिवस साजरे केले जातात.

४. नवरात्रोत्सव : ९ दिवस नामवंत कीर्तनकारांची कीर्तने होतात.

५. दसरोत्सव : दसर्‍याला तरंगे सजवली जातात. तरंगे पहाण्यासाठी गावा-गावांतून लोक येतात. येणार्‍या भाविकांना कौल दिला जातो.

६. दीपोत्सव : कार्तिक अमावास्येला दीपोत्सव असतो.

७. सप्तक : मार्गशीर्ष महिन्यात सप्तक चालू असते. या वेळी गावात भजनाचे पार येऊन रात्रभर भजन करतात आणि दहीहंडीचा कार्यक्रम असतो.

८. काला : पौष कृष्ण पक्ष द्वितीयेला जत्रोत्सव काला साजरा करतात. साखळीतील बाजारकरमंडळी हा उत्सव साजरा करतात. दुसर्‍या दिवशी गवळण काला साजरा होतो आणि रात्री श्री भूमिका नाट्यमंडळाच्या वतीने संगीत नाट्यप्रयोग साजरा केला जातो.

९. होळी : फाल्गुन पौर्णिमेला होळी उत्सव असतो आणि चौथ्या दिवशी घोडेमोडणीचा उत्सव असतो.