भुवनेश्वर (ओडिशा) – येथील लिंगराज मंदिराजवळ पुरातत्व विभागाकडून करण्यात येत असलेल्या उत्खननातून १० व्या शतकातील एका मंदिराचा भाग आढळून आला आहे. यात एक शिवलिंगही सापडले आहे. पुरातत्व विभागाचे म्हणणे आहे की, पंचायतन पद्धतीने या मंदिराचा परिसर बनवण्यात आला आहे. मुख्य मंदिराच्या चारही बाजूंनी साहाय्य मंदिरे बांधण्यात आलेली आहेत. ही मंदिरे सोमवंशाच्या काळातील आहेत. उत्खननात भिंतीचाही भाग सापडला असून त्यावर काही मूर्ती कोरण्यात आल्या आहेत. या मूर्ती पूर्वीच्या येथील संस्कृत महाविद्यालयाच्या परिसराच्या खाली सापडल्या आहेत.