आमदार निळकंठ हळर्णकर यांनी विरोधी सदस्यांच्या विरोधात मांडला अवमानाचा ठराव
पणजी, २७ जानेवारी (वार्ता.) – गोवा विधानसभेच्या हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी राज्यपाल अभिभाषणानंतर सभागृहातून बाहेर जात असतांना विरोधी पक्षाच्या आमदारांनी राज्यपालांना काळे हस्तफलक दाखवले होते. या प्रकरणी थिवीचे आमदार निळकंठ हळर्णकर यांनी २७ जानेवारी या दिवशी विधानसभेत विरोधी सदस्यांच्या विरोधात अवमानाचा ठराव मांडला.
या विषयावरून विरोधी गटातील सदस्यांना सुनावतांना सभापती राजेश पाटणेकर म्हणाले, राज्यपालांच्या अभिभाषणाच्या वेळी विरोधी सदस्यांनी निषेध व्यक्त करणे, हा विशेषाधिकाराचा भंग आहे. हा एक गंभीर प्रकार आहे. संबंधित आमदारांची नोंद ठेवण्यात आली आहे. सभागृहात हस्तफलक आणण्यापूर्वी सभापतींची पूर्वानुमती घेणे आवश्यक आहे. याविषयी मी संबंधित आमदारांना अखेरची संधी देत आहे. (लोकशाहीच्या नावाखाली विरोधक आदरसन्मानही विसरतात का ? राज्यपाल या पदाचा तरी आदर राखूया, असे भान विरोध करतांना का रहात नाही ? – संपादक)