साहित्य संमेलनाचे आयोजक आणि अध्यक्ष याची नोंद घेणार का ?
नाशिक – येथे होणार्या ९४ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात स्वातंत्र्यवीर सावरकरांंना भारतरत्न पुरस्कार देण्याच्या मागणीचा ठराव मांडण्याची मागणी सावरकरप्रेमींकडून केली जात आहे. लोकहितवादी मंडळाचे विश्वस्त आणि साहित्य संमलेनाचे आयोजक हेमंत टकले आणि अध्यक्ष जयप्रकाश जातेगावकर यांना सावरकरप्रेमींनी या मागणीचे निवेदनही दिले आहे. ‘स्वातंत्र्यवीर सावरकर हे येथील भगूरचे पुत्र असल्याने संमेलनाच्या प्रवेशद्वारास त्यांचे नाव देण्यात यावे, तसेच व्यासपिठावर सावरकरांची भव्य प्रतिमा असावी आणि तिचे पूजन करण्यात यावे’, असेही या निवेदनात म्हटले आहे.
स्वातंत्र्यवीर सावरकर हे राष्ट्रीय साहित्यिक, विचारवंत, कवी, लेखक, भाषाशुद्धीकार, कादंबरीकार असून त्यांनी पोवाडे, काव्यसंग्रह, वार्तापत्रे, पुस्तकांचे अनुवाद, इतिहासलेखन अशी अद्वितीय कामगिरी केली आहे. मुंबई येथे झालेल्या ३८ व्या मराठी साहित्य संमेलनात त्यांना अध्यक्षपदाचा मान मिळाला होता. त्यामुळे त्यांच्या जन्मभूमीत होणार्या साहित्य संमेलनात सावरकर साहित्याचा जागर होणे अपेक्षित आहे. सावरकरांच्या साहित्यावर परिसंवाद आयोजित करावा आणि त्यांच्या साहित्यकृतींचे प्रदर्शन मांडण्यात यावे अशा मागण्या निवेदनात करण्यात आल्या आहेत.