सोलापूर येथे हिंदुत्वनिष्ठांनी ‘तांडव’ वेब सिरीजचे पोस्टर जाळून व्यक्त केला संताप

प्रतीकात्मक छायाचित्र

सोलापूर – हिंदूंच्या धार्मिक भावना दुखावल्याच्या प्रकरणी ‘तांडव’ वेब सिरीजच्या विरोधात २१ जानेवारी या दिवशी येथे हिंदु संघटनांच्या वतीने ‘तांडव’ वेब सिरीजचे आणि अभिनेता सैफ अली खानचे पोस्टर जाळून निषेध करण्यात आला. या वेळी ‘सैफ अली खान मुर्दाबाद’, अशी घोषणाही देण्यात आली. येथील सोलापूर-अक्कलकोट महामार्ग येथे असलेल्या मल्लिकार्जुननगर येथे हे हिंदुत्वनिष्ठांकडून आंदोलन करण्यात आले.

‘तांडव’ या वेब सिरीजमध्ये कोट्यवधी हिंदूंचे आराध्यदैवत भगवान शिव आणि भगवान श्रीराम यांच्याविषयी आक्षेपार्ह संवाद दाखवून त्यांचा अवमान करण्यात आला आहे. हिंदु देवतांची विटंबना करून हिंदु संस्कृतीच्या विरोधी कृत्य करणार्‍या ‘तांडव’ वेब सिरीजमधील सैफ अली खान आणि त्याचे सहकारी यांच्या विरोधात निदर्शने करण्यात आली. हिंदू रक्षक संघटनेचे संस्थापक अध्यक्ष अप्पू कडगंची यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आले.