कराडचे तहसीलदार अमरदीप वाकडे यांची कारवाई
सातारा – अवैध वाळू, मुरुम, माती यांसह गौणखनीज उत्खनन प्रकरणी कराड तालुक्यातील अनेकांना दंड केला; मात्र त्यातील काहीजणांनी दंड न भरल्यामुळे त्यांच्या सात-बारा नोंदीवर सरकारी बोजा चढवण्यात आला. संबंधितांनी या कारवाईकडे दुर्लक्ष करत दंड भरण्याचे टाळले. त्यामुळे प्रशासनाकडून दंड न भरणार्यांच्या भूमी सरकार जमा करण्याविषयी नोटीसा पाठवल्या. त्यानंतरही दंड न भरल्याने १ कोटी ४६ लाख ६६ सहस्र २७५ रुपयांच्या वसुलीप्रकरणी कराड तालुक्यातील २१ जणांची भूमी सरकार जमा करण्यात येणार आहे, अशी माहिती कराडचे तहसीलदार अमरदीप वाकडे यांनी दिली. यामुळे दंड न भरणार्यांची झोप उडाली आहे.
कराड येथील कृष्णा नदी पात्रातून अवैधरित्या वाळू उपसा, साठा आणि वाहतूक करणार्यांना तहसील कार्यालयाने दंड ठोठावला होता. तालुक्यातील ८५ जणांच्या सात-बारावर ४ कोटी ५५ लाख ७ सहस्र ३६० रुपयांचा बोजा चढवला होता.