फरीदाबाद येथील कु. पूनम किंगर यांना आलेली वैशिष्ट्यपूर्ण अनुभूती

कु. पूनम किंगर

१. घसा दुखण्यावरील औषधे घेतल्यावर थोड्या कालावधीसाठी वेदना उणावणे आणि पुन्हा त्या चालू होणे अन् त्यामुळे ‘औषधे घेऊ नयेत’, असे वाटणे

‘जानेवारी २०१९ मध्ये मी विश्‍व पुस्तक जत्रेची (वर्ल्ड बूक फेअरची) सेवा केली आणि घरी येतांना रस्त्यातच माझा घसा दुखायला लागला. तेव्हा मला तीव्र वेदना होत होत्या; म्हणून मी औषधे घेत होते. मी अडीच मास औषधे घेतली. त्या वेळी १५ ते १७ घंटे माझ्या वेदना उणावत असत आणि पुन्हा वेदना चालू होत असत. त्यामुळे ‘औषधे घेऊ नयेत’, असे मला वाटत होते.

२. नामजप करतांना ‘विशुद्धचक्रावर एक कमळ निर्माण होत आहे आणि ‘त्यावर श्री सरस्वतीदेवी विराजमान आहे’, असे दृश्य दिसणे

१०.४.२०२० या रात्री मी नामजप करत होते. त्या वेळी भावाच्या स्तरावर नामजप करतांना मला पूर्वी आलेल्या अनुभूतीचे स्मरण होत होते आणि ‘माझ्या सहस्रारचक्रावर श्रीविष्णु शेषशय्येवर विराजमान आहे’, असे दृश्य दिसत होते. ‘युद्धक्षेत्रातील रथात श्रीकृष्ण-अर्जुन माझ्या हृदयात आणि अनाहतचक्रावर उभे आहेत’, असे पूर्वी आलेल्या अनुभूतीत दिसायचे; परंतु आता ‘श्रीविष्णु उभा आहे’, असे मला दिसले. त्या वेळी ‘माझ्या विशुद्धचक्रावर एक कमळ निर्माण होत आहे आणि ‘त्यावर श्री सरस्वतीदेवी विराजमान आहे’, असे मला दिसले. हे दृश्य पाहून मला आश्‍चर्य वाटले आणि मी नामजप करू लागले.

३. वरील अनुभूती आल्यानंतर औषध न घेताही घशातील वेदना थांबणे

१५.४.२०२० या दिवशी माझ्या लक्षात आले, ‘१०.४.२०२० या दिवसापासून मी औषध घेतले नव्हते. मला औषध घ्यायचे स्मरणच झाले नव्हते, तरी औषध न घेताही माझ्या घशातील वेदना थांबल्या होत्या.’ ‘ईश्‍वर मला प्रत्येक क्षणी सांभाळत आहे’, याची मला अनुभूती आली. त्यासाठी मी त्याच्या चरणी कृतज्ञता व्यक्त करते.’

– कु. पूनम किंगर, फरीदाबाद (२०.४.२०२०)

• सूक्ष्म : व्यक्तीचे स्थूल म्हणजे प्रत्यक्ष दिसणारे अवयव नाक, कान, डोळे, जीभ आणि त्वचा ही पंचज्ञानेंद्रिये आहेत. ही पंचज्ञानेंद्रिये, मन आणि बुद्धी यांच्या पलीकडील म्हणजे  ‘सूक्ष्म’. साधनेत प्रगती केलेल्या काही व्यक्तींना या ‘सूक्ष्म’ संवेदना जाणवतात. या ‘सूक्ष्मा’च्या ज्ञानाविषयी विविध धर्मग्रंथांत उल्लेख आहेत.
• सूक्ष्मातील दिसणे, ऐकू येणे इत्यादी (पंच सूक्ष्मज्ञानेंद्रियांनी ज्ञानप्राप्ती होणे) : काही साधकांची अंतर्दृष्टी जागृत होते, म्हणजे त्यांना डोळ्यांना न दिसणारे दिसते, तर काही जणांना सूक्ष्मातील नाद किंवा शब्द ऐकू येतात.
• येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक