भाववृद्धी सत्संगात भावप्रयोग करतांना ६२ टक्के आध्यात्मिक पातळीचे श्री. नागराज कुवेलकर यांना सूक्ष्मातून दिसलेली दृश्ये

१. भाववृद्धी सत्संगात भावप्रयोग करतांना खोलीत नाग आला असून त्याला दूध दिल्यावर त्याने ‘मी आता तृप्त झालो आहे’, असे सांगितल्याचे दृश्य दिसणे

‘१०.९.२०२० या दिवशी मी भाववृद्धी सत्संग ऐकत होतो. या वेळी पितृपक्ष असल्याने गुरुदेव दत्तांविषयी भावप्रयोग चालू होता. त्या वेळी मला पुढील दृश्य दिसले, ‘आमच्या खोलीत नाग फणा काढून उभा आहे. मला त्याची भीती वाटली नाही. मी त्याला जवळ बोलावले. तो जवळ आल्यावर मी त्याला उचलून घेतले आणि त्याच्या डोक्यावरून हात फिरवला. तो मला म्हणाला, ‘मला सद्गुरु कुवेलकरआजींच्या पायांवर बसायचे आहे.’ मी त्याला सद्गुरु कुवेलकरआजींच्या पायावर ठेवले. सद्गुरु आजींनी त्याच्या डोक्यावरून हात फिरवला. त्यानंतर मी त्याला खाली ठेवले आणि त्याला दूध आणून दिले. दूध पिऊन झाल्यावर त्याने सांगितले, ‘मी आता तृप्त झालो आहे.’ त्यानंतर त्याने चकाकणारा एक मणी ठेवला आणि तो निघून गेला.’

श्री. नागराज कुवेलकर

तेव्हा मला जाणवले, ‘नागाच्या रूपात आमचे पूर्वज आले होते आणि त्याने ठेवलेला मणी, म्हणजे नागमणी होता.’

२. भाववृद्धी सत्संगात भावप्रयोग करतांना परम पूज्यांचे चरण बघितल्यावर त्यांच्या दोन्ही चरणांत देवतांची दर्शने होणे

नंतर भाववृद्धी सत्संगात ‘परम पूज्यांच्या चरणांना वंदन करून त्यांना आळवूया’, असे सांगितले. तेव्हा परम पूज्यांचे चरण बघितल्यावर त्यांच्या दोन्ही चरणांत मला देवतांची दर्शने झाली. मला त्यांच्या चरणांत श्रीकृष्ण, हनुमान, श्री दुर्गादेवी, दत्त आणि श्री गणेश यांचे प्रामुख्याने दर्शन झाले. ‘त्यांच्या चरणांतून निळसर प्रकाश बाहेर येत आहे’, असे मला जाणवले. त्या वेळी माझी निर्विचार स्थिती होती आणि माझ्यात कृतज्ञताभाव दाटून आला होता.’

– श्री. नागराज कुवेलकर, कवळे, फोंडा, गोवा. (१०.९.२०२०)

• सूक्ष्म : व्यक्तीचे स्थूल म्हणजे प्रत्यक्ष दिसणारे अवयव नाक, कान, डोळे, जीभ आणि त्वचा ही पंचज्ञानेंद्रिये आहेत. ही पंचज्ञानेंद्रिये, मन आणि बुद्धी यांच्या पलीकडील म्हणजे  ‘सूक्ष्म’. साधनेत प्रगती केलेल्या काही व्यक्तींना या ‘सूक्ष्म’ संवेदना जाणवतात. या ‘सूक्ष्मा’च्या ज्ञानाविषयी विविध धर्मग्रंथांत उल्लेख आहेत.
• सूक्ष्मातील दिसणे, ऐकू येणे इत्यादी (पंच सूक्ष्मज्ञानेंद्रियांनी ज्ञानप्राप्ती होणे) : काही साधकांची अंतर्दृष्टी जागृत होते, म्हणजे त्यांना डोळ्यांना न दिसणारे दिसते, तर काही जणांना सूक्ष्मातील नाद किंवा शब्द ऐकू येतात.
• येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक