कणकवली – देवगड-निपाणी महामार्गावर असलदे ते कोळोशीपर्यंतच्या २ कि.मी. रस्त्याचे काम गेले दोन मास चालू असूनही अद्याप अपूर्ण आहे. हे काम करून येत्या ४८ घंट्यांत रस्ता सुरळीत न केल्यास देवगड येथील सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यालयाला टाळे ठोकणार, अशी चेतावणी असलदे गावचे सरपंच पंढरी वायंगणकर यांनी दिली आहे.
या रस्त्याचे पुढचे पुढचे काम केले जात असतांना मागील रस्त्यावर खड्डे पडत आहेत, तर रस्त्यावर टाकलेल्या खडीमुळे अपघात होण्याची शक्यता असून नागरिक आणि वाहनचालक त्रस्त झाले आहेत. आणखी किती दिवस हे काम चालणार आहे ? असलदे डामरेवाडी ते आयनल फाटा येथील रस्त्याच्या नूतनीकरणाचे काम गतवर्षी पाऊस लवकर चालू झाल्यामुळे रखडले होते. पावसाळा संपल्यावर काम चालू केले नाही. त्यामुळे सरपंच पंढरी वायंगणकर यांनी आंदोलनाची चेतावणी दिली अन् वृत्तपत्रांनी हा प्रश्न उचलून धरल्यावर कामाला प्रारंभ करण्यात आला. (जनतेने आंदोलन केल्यावरच काम करायचे, अशी प्रशासनाची नवीन कार्यपद्धत रूढ झाली आहे का ? असा प्रश्न जनतेला पडल्यास चूक ते काय ? – संपादक) हे काम चालू असतांनाच कामगार पळून गेले. हे रेंगाळलेले आणि अपघातास निमंत्रण देणारे, निकृष्ट दर्जाचे काम बंद करून दर्जेदार काम होण्यासाठी लोकप्रतिनिधी आणि अधिकारी यांनी थोडा वेळ काढावा, अशी अपेक्षा सरपंच वायंगणकर यांनी व्यक्त केली आहे.