२६ जानेवारीला शेतकर्‍यांना ट्रॅक्टर मोर्चा न काढण्याविषयी आम्ही कोणताही आदेश देणार नाही ! – सर्वोच्च न्यायालय

  • सर्वोच्च न्यायालयाने केंद्र सरकारची याचिका फेटाळली !

  • मोर्चाविषयी देहली पोलिसांनीच निर्णय घेण्याची सर्वोच्च न्यायालयाची सूचना !

नवी देहली – देहलीच्या सीमेवर आंदोलन करणारे शेतकरी २६ जानेवारीला प्रजासत्ताकदिनी ट्रॅक्टर मोर्चा काढणार आहेत. याविषयी सर्वोच्च न्यायालयात प्रविष्ट करण्यात आलेल्या याचिकेवर सुनावणी करतांना न्यायालयाने ‘शेतकर्‍यांना देहलीमध्ये प्रवेश देण्याविषयी निर्णय घेण्याचा अधिकार देहली पोलिसांना आहे. कोणताही मेळावा किंवा मिरवणुकीस अनुमती देणे किंवा न देणे अनियमित आणि अयोग्य आहे. हे सूत्र पोलिसांच्या अखत्यारीत येते. त्यांनी याविषयी निर्णय घ्यायचा आहे. आम्ही याविषयी कोणताही आदेश देऊ शकत नाही’, असे स्पष्ट केले. ‘प्रजासत्ताकदिनाचा सोहळा असतांना मोर्चा न काढण्याचा आदेश शेतकर्‍यांना द्यावा’, अशी मागणी केंद्र सरकारकडून करण्यात आली होती.’

‘शांततेने ट्रॅक्टर मोर्चा काढणे हा शेतकर्‍यांचा घटनात्मक अधिकार आहे’, असे शेतकरी संघटनांच्या नेत्यांनी सांगितले होते. प्रजासत्ताकदिनी काढण्यात येणार्‍या ट्रॅक्टर मोर्च्यात सहस्रो शेतकरी सहभागी होतील’, असा विश्‍वासही या नेत्यांनी व्यक्त केला होता.