पुण्यातील कोरड्या कचर्‍यात खाद्यपदार्थांच्या प्लास्टिक पिशव्यांचा वापर सर्वाधिक

प्लास्टिक कचर्‍याच्या मूल्यांकन अहवालातील निष्कर्ष

प्लास्टिक पिशव्यांचा कचरा

पुणे – ‘ग्लोबल ऑडिट ऑफ प्लास्टिक वेस्ट’ या आंतरराष्ट्रीय उपक्रमांतर्गंत पुण्यातील स्वच्छ संस्थेने नुकताच शहरातील प्लास्टिक कचर्‍याचा मूल्यांकन अहवाल प्रसिद्ध केला आहे. शहरात प्रतिदिन जमा होणार्‍या कोरड्या कचर्‍यात खाद्यपदार्थांच्या प्लास्टिक पिशव्यांचा वापर सर्वाधिक असल्याचा निष्कर्ष पुढे आला आहे. यात एकापेक्षा अधिक आवरणाच्या (मल्टिलेअर्ड) पिशव्यांचे प्रमाण अनुमाने ४४ टक्के असून पुनर्वापरास त्या निरुपयोगी ठरत आहेत. खाद्यपदार्थांची व्यापक स्तरावर विक्री करणारी आंतरराष्ट्रीय आस्थापने दुय्यम दर्जाचे प्लास्टिक वापरतात. या पिशव्यांचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत असतांना विघटन मात्र त्रासदायक होत आहे. पर्यावरणासाठी घातक अशा या कचर्‍याविरोधात ‘ब्रेक फ्री फ्रॉम प्लास्टिक’ ही चळवळ विविध देशांत राबवण्यात येत आहे. ‘या आस्थपनांनी पुनर्वापरास योग्य पिशव्यांचा वापर करावा’, अशी मागणी कचरावेचक संस्थांनी केली आहे.

दुधाची ओली पिशवी थेट कचर्‍यात फेकल्यामुळे कचरा वर्गीकरण आणि विल्हेवाट प्रक्रियेतही अडचणी येतात. ‘सॅनिटरी नॅपकिन’ आणि डायपर यांचा कचराही कोरड्या कचर्‍यात फेकला जात असल्याचे निरीक्षण कचरावेचकांनी सर्वेक्षणात नोंदवले आहे. ‘प्लास्टिकच्या वापराविषयी जनजागृती झाली पाहिजे’, असे मत स्वच्छ पुणे प्रकल्प प्रमुख हर्षद बर्डे यांनी व्यक्त केले.