‘पीएम केअर फंड’चा हिशोब सार्वजनिक करा !  

१०० निवृत्त सनदी अधिकार्‍यांची पंतप्रधान मोदी यांच्याकडे पत्राद्वारे मागणी

नवी देहली – कोरोनाच्या संकटामध्ये साहाय्य करण्यास, तसेच उपाययोजनेसाठी खर्च करण्यास पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडून स्थापन करण्यात आलेल्या ‘पीएम् केअर फंड’मध्ये जमा झालेला निधी आणि खर्च यांचा हिशोब सार्वजनिक करण्याची मागणी देशातील १०० सेवानिवृत्त सनदी अधिकार्‍यांनी केली आहे. त्यांनी पतंप्रधान मोदी यांना पत्र लिहिले आहे.

या पत्रात, ‘पीएम् केअर फंड’ माहिती अधिकार कायदा २००५ च्या नियम २ (एच) नुसार सार्वजनिक प्राधिकरण नाही. जर हे सार्वजनिक प्राधिकरण नाही, तर पंतप्रधान, गृहमंत्री, संरक्षणमंत्री आणि अर्थमंत्री हे पीएम् केअर फंडचे सदस्य कसे आहेत ? त्यांची पदे आणि अधिकारीक स्थान उधारीवर देण्यात आले आहे का ? मंत्री असतांना ते विश्‍वस्त का आहेत?’, असे प्रश्‍न विचारण्यात आले आहेत. तसेच ‘पीएम केअर फंडाच्या प्रत्येक गोष्टीत पारदर्शकतेचा अभाव आहे. कोरोनामुळे निर्माण झालेल्या आव्हानांचा सामना करतांना राज्यांची सरकारे त्रस्त झाली होती. त्यांना आर्थिक साहाय्याची आवश्यकता होती आणि अजूनही आहे’, असेही म्हटले आहे.