कोणत्याही परिस्थितीत शैक्षणिक आरक्षण उठवण्याचे षड्यंत्र हाणून पाडू ! – नितीन शिंदे, माजी आमदार

 सर्वपक्षीय कृती समिती सांगली आणि स्वातंत्र्यवीर सावरकर प्रतिष्ठान संचालक मंडळ यांची संयुक्त बैठक

सर्वपक्षीय कृती समितीच्या बैठकीत बोलतांना नितीन शिंदे आणि अन्य

सांगली, १४ जानेवारी (वार्ता.) – स्वातंत्र्यवीर सावरकर प्रतिष्ठानच्या शैक्षणिक कृतींसाठी असलेल्या भूमीवरील आरक्षण उठवण्यासाठी प्रयत्न चालू आहे. कोणत्याही परिस्थितीत आरक्षण उठवण्याचे षड्यंत्र हाणून पाडू, अशी चेतावणी भाजप नेते आणि माजी आमदार श्री. नितीन शिंदे यांनी दिली. या संदर्भात भाजपने त्यांची भूमिका स्पष्ट केली असून काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस यांनीही त्यांची भूमिका स्पष्ट करावी, अशी मागणीही त्यांनी या वेळी केली. या आरक्षणाच्या संदर्भात पुढील भूमिका घेण्यासाठी सर्वपक्षीय कृती समिती सांगली आणि स्वातंत्र्यवीर सावरकर प्रतिष्ठान संचालक मंडळ यांची संयुक्त बैठक प्रतिष्ठानमध्ये पार पडली. या वेळी त्यांनी ही चेतावणी दिली.

सदरच्या बैठकीत कायदेशीर कारवाईसाठी प्रयत्न करणे, सर्वे क्रमांक ३६३/२ आरक्षण रहिवासी क्षेत्रात वर्ग करणेसाठी विरोधात आलेल्या हरकतींवर सुनावणी करण्याची मागणी करणे, १८ जानेवारी या दिवशी महापालिका क्षेत्रातील सर्व आजी-माजी आमदार, सर्व पक्षांचे नेते, महापालिका आयुक्त यांची भेट घेणे, असे निर्णय घेण्यात आले. या वेळी सर्वश्री पृथ्वीराज पवार, सतीश साखळकर, हणमंतराव पवार, वि.द बर्वे, माधव कुलकर्णी, महेश पाटील उपस्थित होते.