मकरसंक्रांत

तिथी

हा सण तिथीवाचक नसून अयन-वाचक आहे. या दिवशी सूर्याचे निरयन मकर राशीत संक्रमण होते. सूर्यभ्रमणामुळे पडणारा फरक भरून काढण्यासाठी प्रति ८० वर्षांनी संक्रांतीचा दिवस एक दिवस पुढे ढकलला जातो. सध्या मकरसंक्रांतीचा दिवस १४ जानेवारी आहे.

इतिहास

संक्रांतीला देवता मानलेले आहे. संक्रांतीने संकरासुर दैत्याचा वध केला, अशी कथा आहे.

महत्त्व

या दिवशी पंचांगाच्या निरयन पद्धतीनुसार सूर्याचे उत्तरायण चालू होते. कर्कसंक्रांतीपासून मकरसंक्रांतीपर्यंतच्या काळाला ‘दक्षिणायन’ म्हणतात. दक्षिणायनात मरण आलेली व्यक्ती उत्तरायणात मरण आलेल्या व्यक्तीपेक्षा दक्षिण लोकात (यमलोकात) जाण्याची शक्यता जास्त असते.

साधनेच्या दृष्टीने महत्त्व

या दिवशी पंचांगाच्या निरयन पद्धतीनुसार सूर्योदयापासून सूर्यास्तापर्यंत वातावरण अधिक चैतन्यमय असल्याने साधना करणार्‍याला या चैतन्याचा लाभ होतो.

दान

अ. ‘पर्वकाळी दानाचे महत्त्व : मकरसंक्रांत ते रथसपतमीपर्यंतचा काळ हा पर्वकाळ असतो. या पर्वकाळी केलेले दान आणि पुण्यकर्मे विशेष फलद्रूप होतात.

आ. दानाच्या वस्तू : ‘नवे भांडे, वस्त्र, अन्न, तीळ, तीळपात्र, गूळ, गाय, घोडा, सोने किंवा भूमी यांचे यथाशक्ती दान द्यावे. या दिवशी सुवासिनी दान देतात. काही पदार्थ सुवासिनी कुमारिकांकडून लुटतात आणि त्यांना तीळगूळ देतात.’ सुवासिनी हळदी-कुंकवाचा कार्यक्रम करून जे दान देतात, त्याला ‘वाण देणे’ असे म्हणतात.

आ १. वाण देण्याचे महत्त्व : ‘वाण देणे’ म्हणजे दुसर्‍या जिवातील देवत्वाला तन, मन आणि धन यांनी शरण जाणे. संक्रांतीचा काळ साधनेला पोषक असल्याने या काळात दिलेल्या वाणामुळे देवतेची कृपा होऊन जिवाला इच्छित फलप्राप्ती होते.

आ २. वाण कोणते द्यावे ? : सध्या साबण, प्लास्टिकच्या वस्तू यांसारख्या अधार्मिक वस्तूंचे वाण देण्याची चुकीची प्रथा पडली आहे. या वस्तूंऐवजी सौभाग्याच्या वस्तू, उदबत्ती, उटणे, धार्मिक ग्रंथ, पोथ्या, देवतांची चित्रे, अध्यात्मविषयक ध्वनीतबकड्या इत्यादी अध्यात्माला पूरक अशा वस्तूंचे वाण द्यावे.

इ. सुगड : ‘संक्रांतीच्या सणाला ‘सुगड’ लागतात. सुगड म्हणजे छोटे मातीचे मडके. सुगडांना हळदीकुंकवाची बोटे लावून दोरा गुंडाळतात. सुगडांमध्ये गाजर, बोरे, उसाची पेरे (कांड्या), शेंगा, कापूस, हरभरे, तीळगूळ, हळदीकुंकू इत्यादी भरतात. रांगोळी घालून पाट मांडून त्यावर पाच सुगड ठेवतात. त्यांचे पूजन करतात. तीन सुगड सवाष्णींना दान (वाण) देतात, एक सुगड तुळशीला आणि एक स्वतःकरता ठेवतात.’

तिळाचा वापर

संक्रांतीला तिळाचा वापर जास्तीत जास्त प्रकारे करतात, उदा. तीळयुक्त पाण्याने स्नान करून तीळगूळ खाणे आणि इतरांना देणे, ब्राह्मणांना तीळदान, शिवमंदिरात तिळाच्या तेलाचे दिवे लावणे अन् पितृश्राद्ध करणे (यात तिलांजली देतात).

तिळाचे महत्त्व

अ. तिळाचा उपयोग केल्याने पापक्षालन होणे : ‘या दिवशी तिळाचे तेल आणि उटणे अंगाला लावणे, तीळमिश्रित जलाने स्नान करणे, तीळमिश्रित पाणी पिणे, तीळहोम करणे अन् तिळाचे दान करणे या पद्धतीने तिळाचा उपयोग करणार्‍यांची सर्व पापे नष्ट होतात.’

आ. आयुर्वेदानुसार महत्त्व : थंडीच्या दिवसात येणार्‍या संक्रांतीला तीळ खाणे लाभदायक असते.

इ. अध्यात्मानुसार महत्त्व

१. तिळात सत्त्वलहरी ग्रहण आणि प्रक्षेपण करण्याची क्षमता जास्त असल्याने तीळगुळाचे सेवन केल्याने अंतःशुद्धी होऊन साधना चांगली होण्यास साहाय्य होते. तीळगूळ एकमेकांना वाटल्याने सात्त्विकतेचे आदानप्रदान होते.

२. ‘श्राद्धात तीळ वापरल्याने असुर वगैरे श्राद्धात विघ्न आणत नाहीत.

पतंग उडवू नका !

सध्या राष्ट्र आणि धर्म संकटात असतांना मनोरंजनासाठी पतंग उडवणे म्हणजे, ‘रोम जळत असतांना नीरो फिडल वाजवत होता’, त्याप्रमाणे आहे. पतंग उडवण्याचा वेळ राष्ट्राच्या विकासासाठी वापरला, तर राष्ट्र लवकर प्रगतीपथावर जाईल आणि साधना अन् धर्मकार्य यांसाठी वापरला, तर स्वतःसह समाजाचेही कल्याण होईल.

किंक्रांत अथवा करिदिन

हा संक्रांतीचा दुसरा दिवस असतो. या दिवशी देवीने किंकरासुराला ठार मारले.

(संदर्भ : सनातनचा ग्रंथ ‘सण साजरे करण्याच्या योग्य पद्धती आणि शास्त्र’)