कोरोनाचे दूरगामी परिणाम…!

कोरोना विषाणूच्या संसर्गाने जगभरातील लोकांच्या जिवाला घोर लावला आहे. इतकेच नाही तर या जागतिक साथीचा लोकांच्या मनःस्वास्थ्यावर विपरीत परिणाम होईल आणि हे आरोग्य संकट निघून गेल्यावरही मानसिक समस्यांचा सामना करावा लागेल, अशी चेतावणी तज्ञांनी दिली. कोरोनाच्या संसर्गाचे प्रमाण आगामी ४ ते ६ मासांच्या काळात आणखी वाढू शकते, अशी चिंता ‘मायक्रोसॉफ्ट’ आस्थापनाचे अध्यक्ष बिल गेट्स यांनी व्यक्त केली. ‘कोविड-१९’च्या या काळात अनेकांची चिंता थोडी वाढली; मात्र काहींना मानसिक आरोग्याच्या तक्रारी जडल्या किंवा त्यात वाढ झाल्याचे दिसून येते.

बिल गेट्स

‘द सायकोलॉजी ऑफ पॅनेडेमिक्स’ या पुस्तकाचे लेखक आणि मानसोपचार विषयाचे प्राध्यापक स्टीव्हन टेलर म्हणतात, ‘‘जवळपास १० ते १५ टक्के लोकांच्या मानसिक आरोग्यावर या जागतिक आरोग्य संकटाचा परिणाम होणार आहे.’’ ऑस्ट्रेलियाच्या ‘ब्लॅक डॉग इन्स्टिट्यूट’ या मानसिक आरोग्यविषयक संशोधन करणार्‍या संस्थेने ‘काही लोकांना दीर्घकाळासाठी तणावाचा सामना करावा लागू शकतो’, असे संशोधन मांडले आहे, तर इंग्लंडमधील काही मानसिक आरोग्यविषयक तज्ञांनी ‘ब्रिटीश मेडिकल जर्नल’मध्ये लिहिलेल्या लेखात ‘कोविड संसर्गाचा शारीरिक परिणामांपेक्षा मानसिक आरोग्यावर होणारा परिणाम दीर्घकाळ टिकेल’, असे म्हटले आहे. थोडे इतिहासात पाहिल्यास लक्षात येते की, संसर्गजन्य आजाराची साथ गेल्यानंतरही त्याचा मानसिक आरोग्यावर झालेला परिणाम टिकून रहातो. सामाजिक विलगीकरणामुळे अनेकांना एकटेपणा, तर ‘आयुष्यात काही उरलंच नाही’, असे वाटू लागले आहे. हीसुद्धा आणखी एक चिंतेची गोष्ट असल्याचे मनोचिकित्सक म्हणतात. यातून समाजाच्या मानसिक स्वास्थ्याचा विचार शारीरिक स्वास्थ्याप्रमाणे करावा लागणार आहे. मानसिक स्वास्थ्य कोणत्याही परिस्थितीत टिकवून ठेवण्यासाठी मनोविकारतज्ञ काही सूचना देणे, मार्गदर्शन करणे इत्यादी करू शकतात; मात्र या सर्वांवर एकमेव परिणामकारक उपाय आहे आणि तो म्हणजे जीवनाकडे सकारात्मकतेने पाहून मनोबल उंचावण्यासाठी काळानुसार साधना करून आध्यात्मिक सामर्थ्य वाढवणे. असे केल्यास अन्य अनेक प्रश्‍न सुटण्यास हातभार लागेल.

– श्री. नीलेश पाटील, जळगाव