कुडाळ (सिंधुदुर्ग) – कोरोना लसीकरणाच्या पहिल्या फेरीमध्ये जिल्ह्यातील ९ सहस्र ४३४ आधुनिक वैद्य, परिचारिका आणि आरोग्य कर्मचारी यांना लस देण्यात येणार आहे. काही खासगी वैद्यकीय व्यावसायिकांनी अजून नोंदणी केली नसल्याने ही संख्या वाढू शकते. दुसर्या टप्प्यामध्ये पोलीस आणि नंतर प्रशासन अन् ५० वर्षांवरील नागरिक, तसेच इतर आजार असणार्यांना लस देण्यात येणार आहे. ६ शासकीय रुग्णालयांत लसीकरण करण्यात येईल. प्रत्येक ठिकाणी दिवसाला १०० जणांचे लसीकरण याप्रमाणे दिवसाला ६०० जणांचे लसीकरण होईल’, असे प्रतिपादन पालकमंत्री उदय सामंत यांनी केले. ११ जानेवारी या दिवशी जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये कोरोना लसीकरणासंदर्भात बैठकीचे आयोजन केले होते. या वेळी ते बोलत होते.
पाच नगरपंचायती आणि ओरोस प्राधिकरणासाठी लघु अग्नीशमन यंत्रणा देण्यात यावी, प्रत्येक मतदारसंघाला विकासकामांसाठी २ कोटी रुपये निधी द्या, कोणीही श्रेयवाद न करता एकत्र येऊन चिपी विमानतळाचे स्वागत करावे, तसेच जिल्ह्यातील ३० वर्षे जुन्या सर्व शासकीय इमारतींचे स्ट्रक्चरल आणि सेफ्टी ऑडिट (रचनात्मक आणि सुरक्षा तपासणी) करावे, आदी सूचना त्यांनी पुढे दिल्या.