बेळगाव – नैऋत्य रेल्वे अंतर्गत येणार्या हुबळी येथील रेल्वे फलाटाची लांबी ५५० मीटर होती. आता ही लांबी १ सहस्र ५०५ मीटरपर्यंत करण्यात येणार आहे. याचे काम युद्धपातळीवर चालू असून येत्या काही मासांत हा रेल्वेचा फलाट प्रवाशांसाठी खुला करण्यात येणार आहे. जगातील सर्वांत अधिक लांबीचा हा फलाट होणार असल्याने नैऋत्य रेल्वेच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला जाणार आहे. हुबळी येथे फलाटाची संख्याही ५ वरून ८ करण्यात येणार आहे. नैऋत्य रेल्वेअंतर्गत हुबळी, बेंगळूरू आणि म्हैसूर विभाग येतात.
हुबळी विभागात ११५ हून अधिक रेल्वे स्थानके येतात. यात बेळगावचाही समावेश आहे. सध्या जगात सर्वांत लांब म्हणून उत्तर प्रदेशातील गोरखपूर येथील १ सहस्र ३६६ मीटर लांबीच्या रेल्वे फलाटाची नोंद आहे. आता हुबळी येथील स्थानकाचे काम पूर्ण झाल्यानंतर हा मान हुबळीला मिळणार आहे.