२४.१२.२०२० या दिवशी आरंभ झालेल्या ‘आपत्कालीन भाववृद्धी सत्संग शृंखले’ची ज्योतिषशास्त्राच्या दृष्टीने वैशिष्ट्ये

२४.१२.२०२० या दिवसापासून आपत्कालीन भाववृद्धी सत्संग शृंखला चालू झाली. ही शृंखला १७.१२.२०२० पासून आरंभ होणार होती; पण काही कारणास्तव सत्संग रहित झाला आणि सत्संग शृंखला २४.१२.२०२० पासून चालू झाली. ‘मागील गुरुवारी चालू होणारी ही सत्संग शृंखला ईश्‍वरी कृपेने या गुरुवारी होणे’, ही ईश्‍वराचीच एक लीला आहे. ‘ज्योतिषशास्त्राच्या दृष्टीने २४.१२.२०२० या दिवशीच्या भाववृद्धी सत्संगाचे विशेष योग काय आहेत ?’, याविषयी महर्षि अध्यात्म विश्‍वविद्यालयाच्या ज्योतिष फलित विशारद सौ. प्राजक्ता जोशी यांना ईश्‍वराने सुचवलेली सूत्रे पुढे दिली आहेत. या माध्यमातून भाववृद्धी सत्संगाचे दिव्यत्व लक्षात येते.

सौ. प्राजक्ता जोशी

१. उत्तरायण

‘या सप्ताहातील सोमवारी, म्हणजे २१.१२.२०२० या दिवशी उत्तरायणाला आरंभ झाला. २४.१२.२०२० या दिवशी आपल्या सत्संग शृंखलेचा आरंभ उत्तरायण चालू झाल्यानंतर येणार्‍या पहिल्या गुरुवारी होत आहे. उत्तरायण काळात सर्व शुभ कार्ये केली जातात.

२. ‘आध्यात्मिक मास’ म्हणून ओळखला जाणारा मार्गशीर्ष मास

मार्गशीर्ष मास हा ‘आध्यात्मिक मास’ म्हणून ओळखला जातो; कारण या महिन्यात मार्तंड भैरव उत्सव, चंपाषष्ठी, देवदिवाळी, गीताजयंती, श्री दत्तजयंती यांसारखे उत्सव साजरे केले जातात. श्रीमद्भगवद्गीतेमध्ये स्वतः भगवंताने म्हटले आहे, ‘मासानां मार्गशीर्षोऽहम् ।’, म्हणजे ‘मासांमध्ये मार्गशीर्ष मास मीच आहे.’ मार्गशीर्ष मास स्वतः भगवंताचेच रूप आहे. या मार्गशीर्ष मासात आपत्कालीन भाववृद्धी सत्संग शृंखला चालू होत आहे, म्हणजे भाववृद्धी सत्संगासाठी साधकांना श्रीविष्णूचे कृपाशीर्वाद आहेत.

३. गीता जयंतीचा आदला दिवस

भगवान श्रीकृष्णाने अर्जुनाला उपदेशामृतरूपी गीता सांगितली. त्याचप्रमाणे गीता जयंतीच्या एक दिवस आधीच आपल्याला आपत्काळात तरून जाण्यासाठी श्रीकृष्णस्वरूप प.पू. गुरुदेवांनी या अनमोल भाववृद्धी सत्संग शृंखलेचे आयोजन केले आहे. श्री गुरूंना शरण जाऊन आपण या सत्संगाचा अधिकाधिक लाभ करून घेणे आवश्यक आहे.

४. अश्‍विनी नक्षत्र

२४.१२.२०२० या दिवशी अहोरात्र म्हणजे पूर्ण दिवस-रात्र अश्‍विनी नक्षत्र होते. २७ नक्षत्रांपैकी ‘अश्‍विनी’ हे पहिले नक्षत्र आहे. हे शुभ नक्षत्र असून या नक्षत्राची देवता श्री अश्‍विनीकुमार आहेत. श्री अश्‍विनीकुमार हे देवांचे वैद्य आहेत. साधकांचे आपत्काळात रक्षण होण्यासाठी मार्गदर्शनपर भाववृद्धी सत्संग अश्‍विनी नक्षत्रावर आरंभ होणे, म्हणजे या आपत्काळात भवसागरातून तरून जाण्यासाठी गुरुकृपेने मिळणारी संजीवनीच आहे.

५. मंगळ आणि शनि हे दोन्ही ग्रह स्वराशीत असणे

‘आपत्काळासाठी म्हणजे सत्-असत् यांच्यातील युद्धकाळासाठी कार्यपरत्वे मंगळ ग्रहाचे ग्रहबल असावे’, असे ऋषीमत आहे. २४.१२.२०२० या दिवशी सकाळी १०.२० नंतर मंगळ हा ग्रह मेष राशीत, म्हणजे स्वराशीत आला आहे. मंगळ ग्रह साहस आणि शौर्य यांचा कारक ग्रह आहे. आपत्काळासाठी आपली मानसिक सिद्धता करवून घेऊन आपल्यातील साहस, शौर्य, तसेच गुरूंवरील श्रद्धा वाढवण्यासाठी या भाववृद्धी सत्संगाच्या माध्यमातून आपले महान गुरु आपल्याला साहाय्य करणार आहेत. यासाठी आपण श्री गुरूंना शरण जाऊन ते भाववृद्धी सत्संगाच्या माध्यमातून आपल्याला जे काही सांगतील, त्यावर श्रद्धा ठेवून त्यांच्या आज्ञेचे पालन करायचे आहे.

२४.१२.२०२० या दिवशी शनि हा ग्रह मकर या स्वराशीत आहे. मंत्र, दीक्षा आणि साधना करण्यासाठी शनि ग्रहाचे बळ असणे आवश्यक आहे; कारण शनि हा चिंतनाचा कारक ग्रह आहे. या काळात केलेले साधनेचे प्रयत्न आपल्याला दीर्घकाळ लाभदायक ठरतील; कारण शनि या ग्रहाला ‘न्यायदेवता’ म्हटले आहे.

७. श्री दत्तगुरूंचा सप्ताह असल्याने या काळात चालू केलेले कार्य आध्यात्मिकदृष्ट्या अधिक फळ देणारे ठरते

श्रीविष्णूच्या दैवी नियोजनानुसार होत असलेल्या भाववृद्धी सत्संगाविषयी श्री गुरुकृपेने लक्षात आलेली सूत्रे गुरुचरणी मनःपूर्वक अर्पण करते.’

– सौ. प्राजक्ता जोशी, ज्योतिष फलित विशारद, वास्तु विशारद, अंक ज्योतिष विशारद, रत्नशास्त्र विशारद, अष्टकवर्ग विशारद, सर्टिफाइड डाऊसर, रमल पंडित, हस्ताक्षर मनोविश्‍लेषण शास्त्र विशारद, महर्षि अध्यात्म विश्‍वविद्यालय, फोंडा, गोवा. (२४.१२.२०२०)