दीपावलीनिमित्त झालेल्या भावसत्संगात गुरुस्मरण आणि आत्मज्योतीचे स्मरण यांनी भावस्थितीत जाणारे पू. सौरभदादा !

पू. सौरभ जोशी

१. सर्वांसाठी ‘ऑनलाईन’ भावसत्संगात श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदाताईंनी आगामी दीपावली भावाच्या स्तरावर कशी साजरी करायची ? याविषयी सांगणे, पू. सौरभदादांनी संपूर्ण सत्संग भ्रमणभाषकडे एकटक लक्ष देऊन शांतपणे ऐकणे

‘५.११.२०२० या दिवशी सर्वांसाठी ‘ऑनलाईन’ भावसत्संग होता. हा भावसत्संग दीपावलीच्या पार्श्‍वभूमीवर होता. मी आणि पू. सौरभदादा खोलीत भ्रमणभाषवर हा सत्संग ऐकत होतो. या सत्संगाच्या माध्यमातून श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदाताई ‘आगामी दीपावली भावाच्या स्तरावर कशी साजरी करायची ?’, याविषयी सांगत होत्या. पू. सौरभदादा संपूर्ण सत्संग एकटक भ्रमणभाषकडे लक्ष देऊन शांतपणे ऐकत होते. अधूनमधून ते ‘जय हो’, असा जयघोष करत होते; मात्र सत्संगाची सांगता जशी समीप येत होती, तसे पू. दादा शांत झाले अन् मला त्यांचे डोळे पाणावल्याचे जाणवले.

२. साधकांच्या अंतरातील सर्व काळोख दूर करून, साधकांना प्रकाश दाखवून त्यांच्या अंतरात गुरुदेवांनी प्रज्वलित केलेली आत्मज्योती कशी आहे, हे दीपावली आपल्याला दाखवणार असल्याचे श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदाताई यांनी सांगणे

​सत्संगाच्या सांगतेच्या वेळी श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदाताई यांनी सांगितले, ‘‘फेब्रुवारी २०१९ मधील प.पू. गुरुदेवांचा सहस्र दीपदर्शन सोहळा झाला. त्या माध्यमातून गुरुदेवांनी प्रत्येक साधकाला त्यांची आत्मज्योती प्रदान केली आहे. त्याचेच स्मरण करून देण्यासाठी या वर्षीची दीपावली आलेली आहे. ‘‘आपल्या अंतरातील सर्व काळोख दूर करून आपल्याला प्रकाश दाखवून आपल्याच अंतरात गुरुदेवांनी प्रज्वलित केलेली आत्मज्योती कशी आहे ? हे ही दीपावली आपल्याला दाखवणार आहे’’, हे श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदाताई सांगत असतांना मला ‘प.पू. गुरुदेवांचा सहस्र दीपदर्शन सोहळा प्रत्यक्ष अनुभवत आहे’, याची अनुभूती घेता आली. हा सत्संग ऐकतांना पू. सौरभदादाही भावस्थितीत होते.

३. गुरूंनी आपल्या अंतरंगामध्ये प्रज्वलित केलेल्या आत्मज्योतीमुळेच आपले सर्वकाही चालू असल्याचे श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदाताईंनी सांगणे आणि त्या सांगत असलेल्या प्रत्येक सूत्रावर पू. सौरभदादांनी ‘हो’ म्हणणे

​या सत्संगात श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदाताई यांनी सांगितले, ‘‘गुरूंनी आपल्या अंतरंगामध्ये प्रज्वलित केलेल्या आत्मज्योतीमुळेच आपले सर्वकाही चालू आहे. प्रत्येकामध्ये असलेली आत्मज्योत ही गुरुस्वरूपच आहे. आत्मज्योत नव्हे, गुरूंचे स्वरूप आपल्यामध्ये कार्यरत आहे. ते आपला प्राण आहेत. ते आपला श्‍वास आहेत. त्यांच्या कृपेनेच आपण जीवन जगत आहोत आणि साधना करू शकत आहोत. अशा गुरूंचे स्मरण, म्हणजेच आत्मज्योतीचे स्मरण आहे. गुरूंचे स्मरण करून आपण साधनेमध्ये एकेक पाऊल पुढे पुढे जाण्याचा प्रयत्न करूया. आताच्या या क्षणापासून आपल्याला सर्वांना त्या आत्मज्योतीचे स्मरण करायचे आहे.’’ त्या वेळी पू. सौरभदादा ‘हो, हो’ म्हणत होते.

४. ‘आपल्या अंतरामध्ये गुरुदेवांनी प्रज्वलित  केलेल्या आत्मज्योतीचे स्मरण करून श्री गुरूंचे बळ अनुभवून त्याद्वारे अनुसंधान साधूया’, असे श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदाताई यांनी सांगणे

त्या पुढे म्हणाल्या, ‘‘आपली आत्मज्योत गुरूंनी प्रज्वलित केलेलीच आहे, तिचे वारंवार स्मरण करूया. जेव्हाही आपल्याला काही त्रास होत असेल, काही सुचत नसेल अथवा काय करायचे, ते समजत नसेल, आपण हतबल होऊ, अशा वेळी किंवा कोणत्याही सेवेला आरंभ करण्यापूर्वी किंवा दिवसाचा प्रारंभ करतांना एक क्षणासाठी का होईना, सर्वांनी डोळे मिटून आपली वृत्ती अंतर्मुख करावे आणि आपल्या अंतरामध्ये गुरुदेवांनी प्रज्वलित केलेल्या आत्मज्योतीचे स्मरण करावे. केवळ त्या आत्मज्योतीच्या स्मरणानेच आपल्याला दिवसभरातील प्रत्येक कृती करण्यासाठी गुरुदेवांचे बळ प्राप्त होणार आहे; कारण ती आत्मज्योत गुरूंनी दिलेली आहे. ती गुरुस्वरूपच आहे. प्रत्येक कृतीपूर्वी आत्मज्योतीचे स्मरण करून श्री गुरूंचे बळ अनुभवूया आणि त्याद्वारे अनुसंधान साधूया.’’

५. भावसत्संगात अनुभवलेली पू. सौरभदादा यांची भावस्थिती !

​ हा सत्संग ऐकतांना माझाही भाव जागृत झाला होता. ‘गुरूंच्या स्मरणात किती आनंद आहे’, हे मी अनुभवत होतो. पू. सौरभदादांचा प्रतिदिन अल्पाहार झाल्यावर त्यांचे कपडे पालटून पुन्हा त्यांना अंथरूणावर झोपवतो. (पू. सौरभदादा हे बहुविकलांग आहेत.) ५ नोव्हेंबरला ४.३० वाजून गेले, तरी पू. सौरभदादा भ्रमणभाषकडे एकटक शांतपणे बघत होते; म्हणून मी त्यांना विचारले, ‘‘पू. दादा, आता उठायचे ना ?’’ त्यावर पू. दादा काही बोलले नाही. मी २ – ३ वेळा विचारल्यानंतरही पू. दादा शांतपणे भ्रमणभाषकडे बघत राहिले. त्यांनी काहीच उत्तर दिले नाही.

६. सत्संगाची सांगता झाल्यावर पू. दादांना उचलण्याविषयी विचारल्यावर त्यांनी काही न बोलता शांतपणे भ्रमणभाषकडे पहाणे आणि प्रत्येक कृतीपूर्वी आत्मज्योतीचे स्मरण करून श्री गुरूंचे बळ अनुभवून त्याद्वारे अनुसंधान साधूया’, असे सत्संगात सांगितल्यावर पू. दादांचे ‘श्रीं’ च्या चरणांचे अनुसंधान साधत ध्यान लागल्याचे जाणवणे

​थोड्या वेळाने सत्संगाची सांगता झाली. तेव्हा मी पुन्हा पू. दादांना विचारले, ‘‘आता उचलू का ?’’ तेव्हाही पू. दादा काही बोलले नाहीत. शांतपणे ते भ्रमणभाषकडे बघतच होते. त्या वेळी मला जाणवले, ‘श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदाताई यांनी भावसत्संगात गुरुस्मरण आणि गुरुदेवांनी प्रज्वलित केलेल्या आत्मज्योतीचे स्मरण करण्यास सांगितले. ‘प्रत्येक कृतीपूर्वी आत्मज्योतीचे स्मरण करून श्री गुरूंचे बळ अनुभवूया आणि त्याद्वारे अनुसंधान साधूया’, असे सांगितले होते. पू. दादांचे त्याच वेळी ‘श्रीं’च्या चरणांचे अनुसंधान साधत ध्यान लागल्याचे जाणवले; कारण आम्ही विचारत असलेल्या प्रश्‍नांना ते काहीच उत्तर देत नव्हते. गुरुस्मरणात ध्यान लागल्याने त्यांना कशाची जाणीव नव्हती.

७. परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे एक मार्गदर्शन चालू केल्यावर पू. सौरभदादा त्याकडे पहात रहाणे आणि काही वेळाने पू. दादांना उचलण्याची सेवा पूर्ण करणे

नंतर मी भ्रमणभाषमध्ये ‘यू. ट्यूबवर’ ‘परात्पर गुरु डॉ. आठवले’ असे ‘सर्च’ केले. तेव्हा मला परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे एक मार्गदर्शन मिळाले. ते चालू केल्यावर तेथे परात्पर गुरु डॉ. आठवले बोलत असल्याचे पू. सौरभदादा यांनी पाहिले आणि नंतर बघतच राहिले. थोड्या वेळाने मी पुन्हा पू. दादांना विचारले, ‘‘पू. दादा, आता उचलायचे का तुम्हाला ?’’ तेव्हा ते ‘हो’ म्हणाले. नंतर मी आणि श्री. सागवेकर यांनी पू. दादांना उचलून त्यांची सेवा पूर्ण केली.

८. पू. दादा खोलीतील परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या छायाचित्राकडे पहात काहीतरी बोलत असणे, ‘पू. दादांची गुरुदेव आणि साधक कशी काळजी घेतात’, हे सांगतांना त्यांच्या मुखावर कृतज्ञताभाव जाणवणे

​एरव्ही पू. दादा खोलीतील परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या छायाचित्राकडे पहात काहीतरी बोलत असतात. ‘जय हो’, असे म्हणून सतत जयघोषही करतात. परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्याविषयी साधकांशी बोलणे होते किंवा पू. सौरभदादांची गुरुदेव आणि साधक कशी काळजी घेतात, हे कृतज्ञतेने मी इतरांना सांगतो, तेव्हाही पू. दादा शांतपणे ऐकत असतात. गुरुदेवांनी पू. दादांचे कौतुक केल्याचे वाक्य बोलले की, ते गालातल्या गालात हसतात. पू. दादांना नेहमी गुरुदेव आणि साधक यांच्याविषयी कृतज्ञता व्यक्त करायची असते. यासाठी ते मला माध्यम बनवतात आणि कृतज्ञता व्यक्त करतात. मी सांगत असतो, तेव्हा त्यांच्या मुखावर कृतज्ञताभाव जाणवतो.

​परात्पर गुरुदेव आणि पू. सौरभदादा यांच्यामुळे मला हे सर्व अनुभवता आले आणि लिहून देता आले. त्यासाठी मी त्या दोघांच्या चरणी कोटीश: कृतज्ञता व्यक्त करतो.’

– श्री. संजय जोशी, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (९.११.२०२०)

• येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या आणि संतांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक